Breaking News

विमान वाहतूकीसाठी राज्यात पोषक वातावरण : मुख्यमंत्री


मुंबई : राज्यात विमान वाहतुकीसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा आणि शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे या उद्योगवाढीसाठी आवश्यक असे पोषक वातावरण आहे. या शिवाय व्यवसायाच्या गरजा बघता आवश्यक त्या सोयी पुरविण्याची राज्याची तयारी आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. एअरपोर्ट अथॉरिटी, भारतीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि फिक्कीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्लोबल एविएशन समिट 2019’ या कार्यक्रमाचे आज उद्घा्टन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अत्याधुनिक तर आहेच त्या शिवाय ते देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन करणारे विमानतळ ही आहे. या विमानतळावर आतापर्यंत सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त विमानांनी उड्डाण केले आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम सन 2020 पर्यत पुर्ण होईल, यामुळे जीडीपी मध्ये एक टक्क्यांची भर पडणार आहे. पुणे येथे नवे अंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे. शिर्डीतील विमानतळ तयार झाले आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्यात येत आहे.

नागपूर हे नागरी हवाई क्षेत्रासाठीचे नवे डेस्टीनेशन असणार आहे. इथे कार्गो सुविधा, लॉजिस्टिक व्यवस्थापन आणि डिफेन्स सारख्या उपक्रमांमुळे नागपूर उपयुक्त ठरते आहे. नागपूर हे मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि देखभाल दुरुस्ती सेवा देणारे (एम आर ओ) विमानतळ आहे. नागपूर हे देशातील कोणत्याही मेट्रो शहरापासून एक तासाच्या विमान प्रवासाच्या अंतरावर आहे. नागपुरला जोडणारे रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे तसेच त्याची भौगोलिक स्थितीमुळे ते व्यवसाय वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. या परिषदेला आलेल्या 83 देशातील प्रतिनिधींनी इच्छा दर्शविल्यास नागपूरला भेटीचे नियोजन करता येईल. सर्वांनी एकदा नागपूरला यावे, असे आमंत्रणही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या ‘प्रत्येक व्यक्तीसाठी उडान’ या स्वप्नाकडे वाटचाल करणारी ‘उडान’ ही योजना आहे. सर्वसामान्याना हवाई वाहतूक करता यावी यासाठी लागणारी व्यवस्था आणि नियोजन करण्यासाठी या समिट मध्ये चर्चा होणार असून त्यामुळे या समिटची थीम असलेल्या ‘फ्लाइंग फॉर ऑल’ या साठी प्रयत्न करणे अधिक सुकर होणार आहे.