Breaking News

ताराबाई मोहिते म्हणजे संस्कारांचे विद्यापीठच : विनायक भोसले


रेठरे बुद्रुक, : शंभर वर्षांपूर्वी ताराबाई आईसाहेबांनी केलेल्या संस्कारांच्या पेरणीमुळेच भाऊ-आप्पांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले. खर्‍या अर्थाने त्या संस्कारांचे विद्यापीठच होत्या, असे प्रतिपादन कृष्णा अभिमत विद्यापीठाचे विश्‍वस्त विनायक भोसले यांनी केले. 

सौ. ताराबाई मोहिते यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे सौ. ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांच्या हस्ते सौ. मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव, तज्ज्ञ तंत्रस्नेही शिक्षक बालाजी जाधव, जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, गटशिक्षणाधिकारी सौ. यु. जे. साळुंखे, सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य संजय पवार, विक्रमसिंह मोहिते, रेठर बुद्रुक विकास सोसायटीचे चेअरमन व्ही. के. मोहिते, उपसरपंच शिवाजीराव चव्हाण, जयवंतराव साळुंखे, वसंतराव घोडके, फटेशपापा मोहिते, माजी उपसरंपच हणमंतराव धर्मे, हेमंत धर्मे, भास्कर पवार, सुनील पवार, बाळकृष्ण कदम, प्रतापराव साळुंखे, चंद्रकांत सूर्यवंशी, राहूल मोहिते, एस. पी. सावंत, बनसोडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. 

आजच्या काळात शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शिक्षण अधिक सुकर होऊ शकते. पारंपरिक शिक्षणाला ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञानाची, डिजिटल माध्यमाची जोड दिली तर मुलांना सहज सोप्या पद्धतीने शिक्षण देणे शक्य आहे. येत्या काळात आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये या नव्या डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. भोसले यांनी नमूद केले. सौ. ताराबाई मोहिते यांच्या स्मृतींना उजाळा देताना ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले, की आईसाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीत जीवन जगताना मोहिते कुटुंबाला भक्कम आधार मिळवून दिला. त्यांच्या प्रगतीशील विचारातूनच भाऊ-आप्पांनी या भागाचे नंदनवन केले. यावेळी खुल्या ग्रंथालयाचे उदघाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने बालाजी जाधव यांनी ‘तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर’ या विषयावर सखोल विवेचन केले.