Breaking News

बीडचा किर्तन महोत्सव ही ओळख कायम राहील-डॉ.भारतभूषण क्षीरसागर


बीड  (प्रतिनिधी) - अध्यात्माच्या दृष्टीकोनातून बीड नगरीचा नावलौकिक वाढला असून खटोड प्रतिष्ठाणचा हा किर्तन महोत्सव सांस्कृतिक वैभवात वाढ करणारा ठरला आहे. बीडचा हा किर्तन महोत्सव ही ओळख कायम राहील असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.गेल्या आठ दिवसांपासून बीड येथे स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य किर्तन महोत्सव सुरू आहे.

 मंगळवारी २० सामुहीक विवाह आयोजीत करण्यात आले होते. या विवाह सोहळया प्रसंगी ह.भ.प.राधाकृष्ण महाराज, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्य डॉ.दिपाताई क्षीरसागर, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतम खटोड, ह.भ.प.राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी, ह.भ.प.प्रज्ञाताई रामदासी, ह.भ.प.हरीदास जोगदंड, सुशिल खटोड, आशिष खटोड, शुभम खटोड यांच्यासह दिलीप गोरे, सखाराम मस्के आदिंची उपस्थिती होती. प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या या २० जोडप्यांना केसोना गॅस एजन्सीच्या वतीने मोफत गॅस वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, बीड जिल्हा हा आगळावेगळा जिल्हा आहे या जिल्ह्यात कला, क्रिडा, नाट्य, साहित्य याबरोबरच धार्मिक क्षेत्रातही नावलौकिक असणारा आहे.

 अध्यात्माच्या दृष्टीने बीडच्या किर्तन महोत्सवामुळे मोठा नावलौकिक मिळाला आहे. राज्यात आणि देशात या किर्तन महोत्सवाची वेगळी ओळख कायम राहील असे सांगून उपस्थित भाविकांना व वधू-वरांना शुभेच्छा दिल्या तर प्राचार्या दिपाताई क्षीरसागर यांनी अतिशय देखना व समाजोपयोगी असा उपक्रम राबवणार्या खटोड प्रतिष्ठाणचे कौतूक केले. रोजच्या जीवनाशी अध्यात्मिक सांगड घातली गेली पाहिजे. चांगले कर्म करीत राहिले तर कलंकही पुसून निघतो. मुलींचा नामकरण सोहळा आणि सामुहिक विवाहासारखे उपक्रम ही सामाजिक बांधीलकी जोपासने म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. बीडचा महोत्सव हा जागतीक पातळीवर पोहोचल्याचे मोठे समाधान असून हा महोत्सव आता बीडकरांचा झाला असल्याचे त्या म्हणाल्या.