Breaking News

किरकोळ वादातून माजी उपसरपंचावर धारदार शस्त्राने मारहाण
शेवगाव/प्रतिनिधी 
तांत्रिक महाविद्यालयाच्या आवारात माजी उपसरपंचास धारदार हत्याराने वार करून जबर जखमी केल्याची घटना राक्षी येथे बुधवारी घडली. याबाबत पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, राक्षी येथील कै. सुमनताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या आवारात येथील माजी उपसरपंच रविंद्र माणीक धायतडक यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून त्यांना जबर जखमी केल्याची घटना बुधवार दि. 9 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याबाबत राजेंद्र माणीक धायतडक यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेवगाव पोलिसांनी अनिल गंगाधर गर्जे, महेश बंडू गर्जे, ऋषीकेश भारत गर्जे, ऋषीकेश नानासाहेब गर्जे, सचिन बारगजे व एक अनोळखी इसम अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी रविंद्र यांना उपचारार्थ नगर येथील रुग्णालयात दाखल केले असून ऋषीकेश गर्जे यांस अटक केली आहे. बुधवार दि. 9 रोजी या महाविद्यालयाचे कनिष्ट लिपीक राजेंद्र धाडतडक हे दुपारी घरी निघाले असता महाविद्यालयाच्या गेटवर समोरुन भरधाव वेगाने स्कार्पिओ जीप त्यांच्या अंगावर आली. ती थांबल्यानंतर त्यांनी चालक महेश गर्जे यांस हळू वाहन चालविण्याचा सल्ला दिला असता याचा राग येऊन वरील आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना कळताच त्याचा भाऊ रविंद्र धायतडक घटनास्थळी आले. हे दोघे महाविद्यालयाच्या इमारतीकडे जात असतानासमोर उभा असलेल्या या आरोपींनी पुन्हा दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली. यातील नितीन बारगजे याने रविंद्र धायतडक यांच्या पोटात धारदार शस्त्र भोकसुन त्यांना जबर जखमी केले. व हे आरोपी जीपमधून फरार झाले. सदर घटनेचा तपास पोलीस हे. कॉ. संजय बडे करीत आहेत.