Breaking News

मल्हारपेठमध्ये राज्यमार्गावर मृतदेह ठेवून ग्रामस्थांनी केला रास्ता रोको


पाटण (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्य व वादातून स्मशानभूमीकडे जाण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मल्हारपेठ (ता. पाटण) येथे लिंगायत समाजातील नागरीकांनी कराड - चिपळूण राज्यमार्गावर मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा रखडलेला प्रश्‍न तातडीने व कायमस्वरूपी सोडवण्याची लेखी हमी दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.

मल्हारपेठ (ता. पाटण) येथे आज सकाळी लिंगायत समाजामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. कराड, पाटण राज्य मार्गालगत असणार्‍या घराशेजारीच हा मृतदेह ठेवण्यात आला होता. दरम्यान, लिंगायत समाजामध्ये मृतदेहाचा दफनविधी करण्यात येत असतो. त्यासाठी काही मंडळी खड्डा काढणेसाठी दर्याचा शिवार नावाच्या परिसरातील स्मशानभूमीकडे जात असताना या मार्गावरील स्थानिक शेतकर्‍यांने अटकाव केला. खाजगी मालकी क्षेत्रातून जाणार्‍या या मार्गावरून वर्दळ होत असल्याने व्यक्तीगत नुकसान होत आहे. स्थानिक प्रशासनाने या मार्गाचा विचार करण्याची विनंती केली. मात्र आक्रमक झालेल्या लिंगायत समाजाने आम्हाला या मार्गावर रस्त्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आल्याशिवाय मृतदेह जागेवरुन हलवणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी या समाजाने कराड पाटण हा राज्यमार्ग रोखून धरत प्रशासनाला जाब विचारण्यास भाग पाडले व लिंगायत समाजातर्फे या मागणीबाबत तालुका व स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान, मल्हारपेठच्या सरपंच व उपसरपंच, पंचायत समिती सदस्य तसेच शिवसेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आदींसोबत चर्चा करून मल्हारपेठ दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरिक्षक, ग्रामसेवक व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी या मार्गावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सहा महिन्यात या रस्त्याचा प्रश्‍न सोडवण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. या बैठकीनंतरच आंदोलन मागे घेण्यात आले आणि आणि प्रेतयात्रेचा मार्ग मोकळा झाला.