Breaking News

शरथ कमलचे विक्रमी नववे जेतेपद


कटक : भारताचा अनुभवी आणि वयस्कर राष्ट्रीय टेबल टेनिसपटू शरथ कमलने येथे विक्रमी नवव्यांदा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. शरथ कमलने यापूर्वी बरीच वर्षे अबाधित राहिलेला कमलेश मेहताचा विक्रम मागे टाकला. महिला गटात अर्चना कामतने पहिल्यांदाच राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले.

पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात शरथ कमलने जी सत्येनचा 11-13, 11-5, 11-6, 5-11, 10-12, 11-6, 14-12 असा 4-3 गेम्समध्ये पराभव केला. सत्येनने यापूर्वी या राष्ट्रीय स्पर्धेत तीनवेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता पण त्याला एकदाही विजेतेपद मिळविता आलेले नाही. शरथ कमलने उपांत्य फेरीत मानव ठक्करचा तर सत्येनने रोनित भांजाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पीएसपीबीच्या अर्चना कामतने पश्‍चिम बंगालच्या कृतिका सिन्हा रॉयचा 12-10, 6-11, 11-9, 12-10, 7-11, 11-3 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. अर्चना कामतने उपांत्य सामन्यात मनिका बात्राचा तर कृतिकाने पश्‍चिम बंगालच्या मुखर्जीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.