Breaking News

चिखलीत पाचवे झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात


चिखली (प्रतिनिधी) : चिखली येथे लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची यशस्वी सांगता करण्यात आली. यावेळी साहित्यासह विविध क्षेत्रात कार्य केलेल्या सन्माननीय मान्यवरांसह, कवी तथा पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. चिखली येथे झेपचे मातोश्री हरणाबाई जाधव स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अ‍ॅड.संतोष झाल्टे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी चंद्रकांत झाल्टे, आमदार चैनसुख संचेती, स्वागताध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे, झेपचे संयोजक डी.एन.जाधव, संयोजन समिती अध्यक्ष अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे, डॉ.प्रतापसिंह राजपूत, संजय चेके पाटील, सतीश गुप्त, श्रीमती ए.बी.साळवे, पंडितराव देशमुख, राजेंद्र व्यास, नगरसेविका सौ.अर्चनाताई खबुतरे, अ‍ॅड.आम्रपाली कस्तुरे, अ‍ॅड.वैशाली कस्तुरे, मधुकर वडोदे, प्रा.अमिताभ पावडे, कडुबा बन्सोडे, दिलीप जाधव यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. सकाळी 8 वाजता जयस्तंभ चौकातील फुले-आंबेडकर वाटिकेत महात्मा फुले तथा डॉ.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे व वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सलीम शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून ग्रंथदिंडीची मुख्य मार्गावरून उंट, घोडे, विद्यार्थी वारकरी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीला पीएसआय मोहन पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. नाळ चित्रपटातील सिनेकलावंत अ‍ॅड.गणेश देशमुख तसेच हिंदी ज्येष्ठ सिनेकलाकार तथा पोलीस उपअधिक्षक अधिक्षक उस्मानाबाद व सिनेअभिनेत्री रेणु महामुने, उत्तमराव जाधव यांच्यासह प्रा.डॉ.प्रतिभा जाधव, यांना जाहीर झालेला पुरस्कार सुवर्णा पावडे यांनी स्वीकारला. तसेच प्रा.डॉ.ज्योती धर्माधिकारी जालना यांना विभागुन भाग्यश्री देसाई, पुणे रमेश डोंगरे (बुलडाणा) मनोज सांगळे औरंगाबाद (पत्रकारिता) तर यवतमाळच्या कांचन वीर (सामाजिक क्षेत्र) यांचा शाल, प्रमाणपत्र व पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.राजा धर्माधिकारी व अ‍ॅड.विजयकुमार कस्तुरे यांनी आपल्या शायरी व कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध करीत वेगळाच रंग भरला. साहित्यिकांच्या विविध कलाकृती व झेप स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटक अ‍ॅड.संतोष झाल्टे व प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे, स्वागताध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे यांनी सामाजिक अभिसरणाबाबत तसेच साहित्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात साहित्यिकांच्या विश्‍वाला असलेल्या महत्त्वाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. साहित्यिक तथा कवी या समाजाच्या महत्त्वपूर्ण व्यक्ति असून त्यांच्यामुळेच समाजपरिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.