Breaking News

राफेलबाबत मित्रपक्षांनी भाजपला धरले धारेवर


नवी दिल्ली : संसदेत राफेल प्रकरणावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. आता यात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सहकारी शिवसेनेच्या भूमिकेमुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राफेल प्रकरणावरून काँग्रेससह विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली आहे. याला अप्रत्यक्षरित्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. 

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत बोलताना रालोआ सरकारला घरचा आहेर दिला. असा कोणता ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता, ज्याची कंपनी केवळ कागदावर असूनही त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाले. हिंदुस्थान एरॉनॉटिकलला सर्वकाही तयार असून मिळाले नाही. जर आमचे सरकार पारदर्शी असेल, तर आम्ही संयुक्त संसदीय समितीला का घाबरतोय? असा प्रश्‍न सावंत यांनी केला. 

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज राफेल मुद्द्यावरून आतापर्यंत सुरुळीत झालेले नाही. गदारोळामुळे वारंवार कामकाज स्थगित करावे लागले आहे. काँग्रेसने जेपीसी मागणी लावून धरली आहे, तर आता रालोआतील सहकारी शिवसेनेनेही राफेलवरून सरकारला घेरण्याची तयारी चालवल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बिजू जनता दलाचे खासदार कैलाशसिंह देव यांनीही लोकसभेत राफेलवरून भूमिका मांडली. कतारने राफेल विमाने कमी किमतीत घेतली आहेत. त्यामुळे आम्हाला सरकारकडे राफेल व्यवहाराबाबत प्रश्‍न विचारण्याचा अधिकार आहे, असे देव म्हणाले.