Breaking News

शेतकरी कामगारांसह स्त्री सबलीकरणास ताकद द्यावी : श्‍वेता सिंघल


सातारा (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार आणि स्त्री सबलीकरण या त्रिस्तरावरच भारतीय अर्थव्यवस्था उभी असून या घटकांना ताकद द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे. 

येथील शाहू क्रीडा संकुलात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत पुणे विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी सकाळी झालेल्या उदघाटन समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंपादक राजेंद्र घुमे, जिल्हा शल्य चिकित्सक अमोद गडीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज पाटील, शासकीय तांत्रिक विधालयाच्या मुख्याध्यापक शाल्मली पवार, औद्यागिक प्रधिक्षण संस्थेचे प्राचार्य तुकाराम मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी सिंघल पुढे म्हणाल्या, विभागीय सहसंचालक घुमे यांच्या नेतृत्वाखाली भरवण्यात आलेल्या या स्पर्धा हा कौतुकास्पद उपक्रम आहे. अध्यक्षस्थानावरुन बोलताना सहसंचालक घुमे म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालय सातारा यांनी या स्पर्धेचे केलेले नियोजन अत्यंत स्तुत्य आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाधिकारी सचिन धुमाळ, तांत्रिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पवार यांनी याआधी विशेष परिश्रम घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान उदघाटन समारंभारवेळी छाबडा मिलिटरी स्कूल आणि आयटीआयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थांनी सुरेख मानवंदना दिली.
प्रास्ताविक सचिन धुमाळ तर आभार मुख्याध्यापिका पवार यांनी मानले. पहिल्या दिवशी क्रिकेट, धावणे, व्हॉलीबॉल, बुद्धीबळ, क्यारम, या सामन्यांना प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत पुणे विभागातील सातारा, सोलापूर, पुणे, कोल्हापूर आणि सांगली येथील आयटीआय व टेक्नीकल हायस्कूलच्या सुमारे 350 विद्यार्थांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला.