Breaking News

तीनशे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत - लष्कर प्रमुख रावत


नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून देशात 300 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे, असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी (दि.10) सांगितले.

रावत लष्कराच्या वार्षिक पत्रकार परिषदेत बोलत होते. रावत यांनी पाकिस्तानला कडक संदेश देताना, उभय देशांमध्ये चर्चा आणि दहशतवाद एकत्र जाऊ शकत नाही, असे म्हटले. फुटीरतावाद्यांशी चर्चा करणार का? या प्रश्‍नावर उत्तर देताना त्यांनी, बंदूक बाजूला ठेवून हिंसाचार थांबवा आणि शेजारून पाठिंबा घेण्याचेही सोडून द्या, असे सांगितले. रावत म्हणाले, की भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळली आहे. त्यामुळे सुरक्षेविषयी चिंता करण्याचे कारण नाही. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा होण्याची गरज आहे. उत्तर आणि पश्‍चिम सीमेवरील परिस्थितीही आम्ही चांगल्या रीतीने हाताळली आहे. 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेसह रशियाचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हालाही अफगाणिस्तानमध्ये स्वारस्य आहे. आम्ही तेथील परिस्थितीपासून दूर राहू शकत नाही; मात्र ही रणनीती आम्ही जम्मू- काश्मीरमध्ये लागू करू शकत नाही. कारण काश्मीर मुद्यावर आम्ही उभय देश सोडून चर्चा करू शकत नाही. तसेच आम्ही स्वतःच्या धोरणांवरच चर्चा करू, असेही रावत यांनी ठणकावून सांगितले.