Breaking News

सातार्‍यात ऐतिहासिक गोखले हौदावरील झाडाची कत्तल


सातारा (प्रतिनिधी) : पालिका वृक्ष सभेच्या बैठकीत बेकायदेशीर वृक्षतोडीवरून झालेला खल सर्वश्रुत असताना विना परवानगी वृक्षतोडी प्रकरणी सातारा नगर परिषद प्रशासन टीकेचे धनी ठरले होते. अशातच व्यंकटपुरा पेठेतील ऐतिहासिक गोखले हौदावरील झाड तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.सातारा नगरीचे निर्माते छ. शाहू महाराज यांचा 12 जानेवारी रोजी राज्याभिषेक झाला होता. तो दिवस सातारा नगरीत उत्साहाने साजरा होत असताना छ. शाहूराजे कसे वृक्षप्रेमी होते, याचे दाखले दिले जातात. शहरालगत लिंब येथे 200 एकराच्या माळरानावर छ. शाहूंनी आमराई निर्माण केली होती. अशा बहुआयामी छ. शाहूंच्या नावानेच सातारा शहराला शाहूनगरी म्हटले जाते. मात्र, पालिकेकडून वृक्षप्रेमी छ. शाहू कृती अंमलात आणली जात नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आरटीओ कार्यालय, व्यंकटपुरा पेठेसह शहरातील विविध ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोडी होत असूनही नगरपरिषद प्रशासन कारवाई करीत नसल्याने ऐतिहासिक गोखले हौदावरील झाड तोडण्यापर्यंत लोक मागे-पुढे पाहत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. असाच प्रकार मागे फाशीच्या वडाच्या बाबतीत घडला होता. शासन वृक्ष लागवड-संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत कोट्यावधींचा निधी खर्ची टाकत असताना सातारा पालिका हद्दीत होत असलेल्या वृक्षतोडींमुळे जिल्हा प्रशासनाने पालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्ष करत अभय दिले आहे का, असा सवाल जनमाणसातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी या प्रकारची गांभीर्याने दाखल घेत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.