Breaking News

बालिकेस त्रास देणार्‍याविरूध्द वाईत उपोषण सुरू
वाई, (प्रतिनिधी) : वाई शहरातील यशवंतनगरमधील भंगार व्यवसाय करणार्‍या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीची भर रस्त्यावर छेडछाड करून जबरदस्तीने तिच्या अंगाशी लगट करणार्‍या व्यक्तींवर वाई पोलिसात तक्रार देवूनही संबधितांवर कसलीही कारवाई होत नसल्याने मुलीच्या वडिलांनी सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांकडे धाव घेतली असून छेडछाड करणार्‍या व्यक्तीवर प्रोक्सोअंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आजपासून पिडीतग्रस्त मुलीचे संपूर्ण कुटुंब उपोषणास बसले आहे. 

याबाबत संबंधित कुटूंबाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यशवंतनगर येथील भंगारव्यवसायिक अमर घाडगे यांची पत्नी त्यांच्या अल्पवयीन मुलीला सोबत घेवून तीन जानेवारीला सकाळी 11 वाजता नित्यनियमाप्रमाणे वाई सुरूर रस्त्यावर भद्रेश्‍वर पुलानजीक भंगार गोळा करण्यासाठी गेली होती. त्या वेळी भीमनगरमधील सदा हातूर, राजू लंकेश्‍वर यांनी घाडगे यांच्या मुलीचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने आरडाओरडा करताच दोघेही संशयित पळून गेले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मुलीला घेवून तिची आई वाईच्या पोलिस स्टेशनमध्य गेली. मात्र तिथे उपस्थित पोलिस अधिकार्‍यांनी तक्रार दाखल फिर्यादी कुटुंबालाच पोलीस ठाण्यातून हाकलून दिल्याचा आरोप घाडगे कुटूंबियांनी निवेदनात केला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी वाई पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करून घेण्यास सांगितले. त्यानुसार फिर्याद नोंदवण्यात आली, परंतू सदर फिर्यादी अर्जाची नक्कल मागूनही देण्यात आली नाही. गंभीर घटना घडूनही संबधित संशयितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करून याप्रश्‍नी बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, तहसीलदार रमेश शेडगे यांना लेखी निवेदन देवून त्यानुसार आजपासून तहसिल कार्यालयासमोर संपूर्ण घाडगे कुटूंबाने उपोषणास प्रारंभ केला आहे.