Breaking News

पळसगावच्या धान्यदुकानदारावर कारवाईची मागणी


वडूज (प्रतिनिधी) पळसगाव (ता. खटाव) येथील रेशनिंग दुकानदाराने धान्याचा गैरव्यवहार करून शिधाधारकांकडून जादा दराने पैसे उकळले असल्याचा आरोप करीत संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातील माहिती अशी की, पळसगावमधील धान्य दुकानदाराने संपूर्ण कॅश मेमोमध्ये प्रत्यक्ष असणारा धान्याचा माल न देता पुन्हा कार्बनकॉपीवर मोठ्या प्रमाणात खाडाखोड करून धान्याचा अपहार करत दरांमध्ये फरक केला आहे. त्यामुळे दुकानचालक सरस्वती अंकुश फडतरे यांनी लोकांना नुकसान भरपाई द्यावी. 

याबाबत ग्रामस्थांनी याबाबत शासकीय कार्यालयात पत्रव्यवहारही केला आहे. विशेषतः या दुकानदाराची चौकशी तालुका पुरवठा अधिकार्‍यांनी केली आहे. व त्यांनी याबाबतचा अहवाल ही वरिष्ठ कार्यलयात सादर केला आहे. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ही ग्रामस्थांनी केला आहे. 

या प्रसिध्दी पत्रकावर प्र. पा. कुबेर, दशरथ फडतरे, हणमंत फडतरे, प्रकाश घाडगे, जगनाथ फडतरे, प्रल्हाद शिंदे, कमल घाडगे व इतर जणांच्या सह्या आहेत. स्थानिक पुरवठा विभागाने संबंधित दुकानदाराची चौकशी केली असून तसा अहवाल वरिष्ठ कार्यलयात सादर केला आहे. मात्र, एवढा अपहार होऊन ही वरिष्ठ अधिकारी कारवाई का करीत नाहीत असा प्रश्‍न ही ग्रामस्थांनी उपस्थित केला.