Breaking News

जमिनीच्या मोबदल्याबाबत रेल्वेने द्यावा लेखी खुलासा : सिंघल


सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील विस्तारित रेल्वेसाठी लागणार्‍या जागांसाठी रेल्वे विभाग शेतकर्‍यांच्या जमिनीचा मोबदला कसा देणार, त्याबद्दल रेल्वेने लेखी खुलासा करावा, असे जिल्हाधिकार्‍यांनी आज रेल्वेच्या अधिकार्‍यांना सांगितले.

रेल्वेच्या विस्तारीकरणात अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी जात आहेत, त्याबाबत अनेक प्रश्‍न आहेत. त्याबाबत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी मध्य रेल्वेचे उपमुख्य व्यवस्थापक आलोक मित्तल, मध्य रेल्वेचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण तोडस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाचे प्रमुख सचिन नलावडे आणि संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. 

आजपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडून रेल्वेसंदर्भात बैठका घेतल्या जात आहेत. त्यासाठी रेल्वेनी पुढाकार घेणे अभिप्रेत असल्याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या शेतातील पिक कापल्याच्या तक्रारी आहेत. त्या शेतकर्‍यांना त्या पिकाची भरपाई रेल्वेकडून मिळाली पाहिजे. जिथे शेतकर्‍यांच्या जमिनी अधिकच्या गेल्या आहेत त्या मोजून त्याचा मोबदला दिला जावा. जर शेतकर्‍यांनी रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण केल आहे ते परत द्यावी लागेल. रेल्वेला द्यावयाच्या जमिनीचे मोजमाप ताबडतोब करुन घ्यावे, शेतकर्‍यांचे जे प्रश्‍न आहेत ते सोडावेत. त्यासाठी रेल्वेकडून एक नोडल ऑफीसर नेमावा असे मित्तल यांना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.