Breaking News

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘वर्‍हाड कन्या’ राष्ट्रपतींना देणार सलामी


बुलडाणा,(प्रतिनिधी): आसाम रायफलच्या 184 वर्षाच्या इतिहासात अवघ्या चार वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला कमांडन तुकडीला 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडमध्ये राष्ट्रपतींना सलामी देण्याचा बहुमान मिळाला आहे. दरम्यान, या ऐतिहासिक 147 महिलांच्या तुकडीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या चायगाव येथील रुख्मिना परमेश्‍वर राठोड या विदर्भ कन्येचा समावेश आहे. आसाम रायफलच्या महिला तुकडीच्या माध्यमातून राष्ट्रपतींना सलामी देणारी जिल्ह्याची ती पहिला कन्या ठरणार आहे. आसाम रायफलच्या इतिहासातील ही ऐतिहासिक परडे ठरणार असून त्यासाठी आसाम रायफलच्या महिला रेजीमेंटच्या मेजर खुशबू आणि कॅप्टन रुची यांच्या नेतृत्त्वात गेल्या पाच महिन्यापासून रुख्मिना ही दिल्ली येथे सहकारी महिलांसोबत कसून सराव करतेय. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या चायगाव येतील ती मुळची रहिवाशी असून 12 वी पर्यंतचे तिचे शिक्षण हे मेहकरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चायगाव येथेच झाले. त्यानंतर मेहकर येथे तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतल आहे. 31 मार्च 2015 ला तिची आसाम रायफलच्या महिला कमांडन तुकडीमध्ये निवड झाली. आसाम रायफलच्या मोड आर्मीमध्ये ती कार्यरत आहे. घरची जेमतेम परिस्थिती दोन एक्कर शेती अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला हातभार लावत तिने मोठ्या धैर्याने ही वाटचाल केली आहे. त्यामुळे एका अल्पभूधारक शेतकर्याची मुलगी राजपथावर आता थेट राष्ट्रपतींना सलामी देणार आहे. यापूर्वी बुलडाण्याचीच कन्या असलेल्या मेघा सराफ हीने काही वर्षापूर्वी एनसीसीच्या माध्यमातून ही संधी 2005-06 मध्ये मिळवली होती. त्यानंतर हा बहुमान रुख्मिना राठोडला मिळाला आहे. आसाम रायफलच्या शुकोवी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नागालॅन्डमध्येही तीने प्रशिक्षण घेतले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडमध्ये राष्ट्रपतींना सलामी देणारी आसाम रायफलच्या महिलांची ही पहिलीच तुकडी आहे. राजपथावर प्रामुख्याने राष्ट्रपतींना सलामी (सॅल्युटींग डेस्क) देताना सुमारे 500 मिटरचे अंतर या तुकडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सॅल्युटींग डेस्कदरम्यान ‘दाहिने देख’ करीत या महिला तुकडीला मार्च करावा लागणार आहे. त्यादृष्टीने साडेतीन किलोची रायफल घेऊन हा सॅल्युटींग डेस्क लिलया पारकरण्याचे कसब अंगिकृत करण्यासाठी सध्या ही तुकडी सराव करत आहे. 1835 मध्ये स्थापन झालेल्या आसाम रायफलच्या इतिहासात अवघ्या चार वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या महिला कमांडनच्या तुकडीने थेट राजपथावर पथसंचलनात सहभागी होण्याचे हे यश अविश्‍वसनीय म्हणावे लागेल. गेल्या पाच महिन्यापासून ही तुकडी दिल्लीमध्ये सराव करीत असून दररोज पहाटे चार वाजल्यापासूनच त्यांचा दिवस सुरू होत असून 15 ते 18 किलोमीटर अंतर त्यांना शस्त्रासह पार करावे लागते. त्याचा कसून सराव त्या दररोज सहा ते आठ तास सध्या करीत आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसोबतच शस्त्र हाताळण्याचे कठीण ट्रेनिंग त्यांना मिळालेले असून पुर्वोत्तर भागात घडणार्या एनकाऊंटरसह कठिण परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रशिक्षण या तुकडीला देण्यात आले आहे. त्यात बुलडाण्याची रुख्मिना चांगलीच वाकबगार आहे.