Breaking News

जुन्या कोयना पुलाचे काम लवकर करावे : आ. बाळासाहेब पाटील


कराड (प्रतिनिधी): मुंबई- बेंगलोर या महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाका व महात्मा गांधी पुतळा परिसर येथे सातत्याने वाहनांची होणारी कोंडी व गर्दी लक्षात घेऊन जुन्या कोयना फुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार बाळासाहेब पाटील यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिल्या.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात शहरातील वाहतूक कोंडी आणि जुन्या कोयना पुलाच्या दुरुस्ती कामासंदर्भात झालेल्या मीटिंग मध्ये ते बोलत होते. यावेळी कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे, डीवायएसपी नवनाथ ढवळे, संभाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता समाधान पाटील, सुधाकर कुंभोज इत्यादी उपस्थित होते.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, अंतरराष्ट्रीय महामार्ग क्र.47, मुंबई- बेंगलोर या महामार्गावरून कराड शहरात येण्यासाठी कोल्हापूर नाका हे महत्वाचे ठिकाण आहे. मात्र दिवसेंदिवस येथून आत- बाहेर करताना वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होत असून, अनेकदा वाहतूक समस्या निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. तेव्हा ही समस्या दूर करण्यासाठी जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे, हे अधिकार्‍यांनी लक्षात घेऊन काम संपुष्टात आणावे.