Breaking News

तृणमूलच्या खासदाराचा भाजपत प्रवेश


नवीदिल्लीः लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी राहिला असतानाच पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील खासदार सौमित्र खान यांनी बुधवारी भाजपत प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसचे आणखी पाच खासदार निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करतील, असा दावाही भाजप नेत्यांनी केल्याने तृणमूल काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

खान हे गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज होते. पोलिस अधिकार्‍याने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी सौमित्र यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच खान हे पक्षनेतृत्वावर नाराज होते. बुधवारी सकाळी खान यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने ते भाजपत जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दुपारी त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पश्‍चिम बंगालमधील भाजप नेते मुकूल रॉय यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. मला मोदींसोबत काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पश्‍चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून राज्यातील गुंडांना तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला. पश्‍चिम बंगालमधील पोलिस निष्पाप तरुणांना तुरुंगात धाडत असून अशा परिस्थितीत मी त्या पक्षात राहू शकत नव्हतो. मी मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास धोरणाचे समर्थन करतो, असे त्यांनी सांगितले. खान यांच्यापूर्वी मुकूल रॉय यांनी देखील तृणमूलमधून भाजपत प्रवेश केला होता. रॉय हे ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.