Breaking News

सिद्धटेकच्या सिद्धिविनायक प्रदक्षिणा मार्गावर अंधारकुळधरण/प्रतिनिधी

अष्टविनायकापैकी एक म्हणून प्रसिध्द असणारे सिध्दटेक ता. कर्जत येथील सिद्धिविनायक मंदिरा सभोवतालच्या चारही दिशेला वीज प्रकाशाची कायमस्वरूपी सोय नसल्याने त्याला अंधाराचा विळखा पडला आहे. त्याचबरोबर एक कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या प्रदक्षिणा मार्गावर आतील बाजूने ही कायमस्वरूपी वीजेची सोय नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. दर चतुर्थीला भक्त दर्शनासाठी टप्प्या टप्पाने पहाटे तीन वाजल्यापासून ते रात्री किमान अकरा वाजेपर्यंत दर्शनाला गर्दी करतात. अशा वेळी प्रदक्षिणा पूर्ण करताना भक्तांना भिती वाटते . तसेच काम करताना पडलेले खड्डे पूर्णपणे बुजले नसल्याने काही वेळेस भक्तांच्या पायांना जखमा ही होत आहेत. या गोष्टीचा विचार करून बांधकाम ठेकेदार, देवस्थान, व प्रशासने तातडीने या दुरूस्त्या करून भक्तांना दिलासा द्यावा. मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग हा अंदाजे एक किलोमीटर गोलाकार आहे. अनेक भक्त आपल्या भक्तीभानुसार तीन , पाच , नऊ, अकरा, एकवीस प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे त्यांचा काही तास वेळ जातो आशा वेळी जर मार्गावर निधी असून मुलभूत सुविधा मिळत नसतील तर भक्तांचे मोठे दुर्देव आहे. याचाही देवस्थान व प्रशासनाने विचार केला पाहिजे .

बाहेरगावाहून रात्री सातनंतर येणार्‍या भक्तांना तेथील दुकानदारांना मंदिर व मंदिराचा रस्ता विचारावा लागत आहे. ही एक मोठी शोकांतिका आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून सिध्दटेकच्या विकासकामासाठी अंदाजे साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यासाठी प्रांतधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक सदस्यासह विकासकामे सुचवणे व पूर्ण करून घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष व सदस्यांमध्ये समन्वय नसल्याने विकासकामांना गती मिळत नाही. असा स्थानिकांचा आरोप आहे. मंदिराला वर्तुळाकार डांबरी रस्ता असून त्या मार्गावरून दौंड, श्रीगोंदा, कर्जत येथून येणार्‍या वाहनांचे व गणेशभक्तांचे प्रमाण जास्त आहे. परंतु अंधारामुळे मंदिर व रस्ता निश्‍चित लक्षात येत नसल्याने अनेक वाहने गोलाकार चकरा मारत बसतात. सिद्धटेकच्या सभोतालची सर्व गावे ’ हायमॅक्स दिव्यांनी ’ उजळून निघालेली असताना सिद्धटेकचा अंधार कधी दूर होणार याचा प्रश्‍न गणेशभक्तांना पडला आहे. मंदिर प्रवेशद्वारासमोर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लावलेला एकमेव हायमॅक्स दिवाही बंद आहे.

मंदिराच्या चारही दिशेला व प्रदक्षिणा मार्गावर देवस्थान-ग्रामपंचायत व प्रशासनाने समन्वय साधून कायस्वरूपी वीज दिव्यांची सोय उपलब्ध करून तसेच पडलेले खड्डे बुजवून गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळावी ही माफक अपेक्षा आहे.