Breaking News

दखल- भाजपला पूर्वांचलात मोठा धक्का


भाजपला काँग्रेसमुक्त भारत करण्यात यश आलं नसलं, तरी पूर्वांचलातील सात राज्यांत मात्र काँग्रेसचा पाडाव करण्यात यश आलं आहे. अर्थात सर्वंच राज्यात भाजपनं यश मिळविलेलं नाही; परंतु तिथं भाजपच्या मित्रपक्षांना यश आलं आहे. अशा पार्श्‍वभूमीवर अरुणाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग यांनी भाजपला रामराम केला आहे. भाजपला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
..
गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला पराभवाचा धक्का बसला, तरी मणिपूरमध्ये काँग्रेसचा पाडाव झाला. त्यामुळं भाजपला काहीसं हायसं वाटलं असेल. पूर्वांचलातील सात राज्यांपैकी एकही राज्य आता काँग्रेसच्या ताब्यात नाही. त्यामुळं भाजपला इतरत्र काँग्रेसमुक्त भारत करता आला नसला, तरी पूर्वांचलात मात्र ते साध्य करता आलं. मध्य व पश्‍चिम भारतात या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात भाजपचं नुकसान होणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, महाराष्ट्र या राज्यांत भाजपच्या जागा कमी होतील. या जागा भरून काढण्यासाठी भाजप पूर्वेकडील राज्यांकडं तसंच दक्षिणेतील राज्यांकडं पाहिलं जात होतं. पूर्वांचलात लोकसभेच्या 25 जागा आहेत. या राज्यांकडं भाजप मोठ्या अपेक्षेनं पाहत होतं. अरुणाचल प्रदेशात भाजपनं ज्या पद्धतीनं काँग्रेसचं सरकार पाडलं, ती पद्धत घटनासंमत नव्हती. एका मोठ्या पक्षाचं विलीनीकरण करून घेतलं होतं. आता त्या घटनेला एक वर्ष होत नाही, तोच भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. ज्योती बसू, माणिक सरकार आणि गेगांग अपांग या तिघांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ देशात प्रदीर्घ आहे. अपांग हे 22 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचा त्याग करून भाजपत प्रवेश केला. पूर्वांचलात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अरुणाचल प्रदेशात वर्तमानपत्र काढून ते त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखविलं. अशा अपांग यांनी आता भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजपत अंतर्गत नाराजी वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात उघडपणे बोलायला नेत्यांनी सुरुवात केली आहे. मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुणगाण गायिलं होतं. वाजपेयी यांचं पक्षासाठी योगदान, त्यांची उदारमतवादी भूमिका, त्यांचं सर्वांना बरोबर घेऊन जाणं आदी बाबी देशवासीयांना भावत होत्या. काश्मीरमधील नागरिकांचं अतोनात प्रेम मिळविलेले ते अलीकडच्या काळातील एकमेव पंतप्रधान होतं. अशा वाजपेयी यांचं मोदी यांनी गुणगान गायिल्यामुळं वाजपेयी यांना मोठेपण आलं नाही; परंतु ज्यांचं गुणगान आपण गातो, त्यांनी राजधर्म पाळण्याचा दिलेला सल्ला आपण पाळला नाही, याचं भान मोदी यांनी ठेवलं नव्हतं. गपांग यांनी राजीनामा देताना नेमका हाच सूर आळवला आहे. 

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर मोदी आ शाह यांना पक्षातूनच आव्हान दिलं जाऊ लागलं आहे. आतापर्यंत यशाचं श्रेय मोदी यांना दिलं जात होतं. त्यामुळं तीन राज्यांतील अपयशाचं श्रेय ही त्यांचंच आहे; परंतु तसं बोलण्याचं धाडस कुणीच करीत नव्हतं. ते धाडस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध असलेल्या आणि नागपूरच्याच असलेल्या नितीन गडकरी यांनी केलं होतं. एकदा नव्हे, तर दोनदा त्यांनी तसं बोलण्याचं धाडस केलं. ज्या मोदी यांनी गांधी परिवारावर सातत्यानं टीका केली. त्याच इंदिरा गांधी यांचं गडकरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राष्ट्रसेविकांच्या कार्यक्रमात तोंड भरून कौतुक केलं. अर्थात वाजपेयी यांनीही बांगलादेश निर्मितीनंतर इंदिराजीचं कौतुक केलं होतं. ही पार्श्‍वभूमी पाहता अपांग यांनी आता आळवलेला सूर महत्त्वाचा आहे. अपांग यांनी पक्षनेतृत्वाबद्दल नाराज असल्याचं सांगत भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजपला आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या तत्वांचा विसर पडला आहे. पक्ष केवळ सत्तेसाठी वाटेल त्या थराला जात आहे आणि कार्यकर्त्यांना थोडंही महत्व दिलं जात नाही,’ असं म्हणत अपांग यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तेवढ्यावर ते थांबले नाहीत, तर पक्ष आणि मोदी सरकारकडूनही जे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत, त्यांची दखल घेतली जाताना दिसत नाही. शाह आणि मोदी यांनी वाजपेयींनी सांगितलेला राजधर्म आठवावा. अन्यथा इतिहास तुमचं मूल्यांकन करेन,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. शाह व मोदी यांच्या कार्यपद्धतीविषयी देशाच्या सर्वंच भागातून नाराजी आहे; परंतु ते बोलण्याचं धाडस कुणीच करीत नव्हतं. ते आता गपांग यांनी केलं. नेमकं त्याच्या दोन दिवस आधी मध्य प्रदेशातून असाच नाराजीचा सूर लागला. शिवराजसिंह चौहान यांना मध्य प्रदेशाच्या राजकारणात रस आहे. निवडणुकीनंतर त्यांनी तशी भावना बोलून दाखविली होती. मरेपर्यंत कुठंही जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. असं असताना त्यांना राज्यात महत्त्वाचं पद देण्याऐवजी भाजपचं राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद देताना चौहान यांना विश्‍वासात घेतलं नाही. मोदी यांनी विधानसभेच्या निवडणुकीत चौहान यांचा अनेक ठिकाणी नामोल्लेखही टाळला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या नेतृत्वाबद्दल प्रथमच भाजपमध्ये उघड नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. शाह यांच्या जागी शिवराजसिंह चौहान यांना पक्षाध्यक्ष करा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यानं केली होती. त्यांनी तर मोदी यांच्या लीडरशीपखाली भाजपला सत्ता येणार नाही, असा इशाराच दिला होता. नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करा आणि पक्षाची सूत्रं राजनाश सिंह यांच्याकडं देण्याची मागणी केली होती. दलित नेते आणि भाजपचे माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम यांनी असं बोलण्याचं धाडस केलं. ’भाजपला 2019 मध्ये सत्तेत यायचं असेल, तर पक्षातील नेत्यांच्या कामात बदल करायला पाहिजे. देशात असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रश्‍नांचा विसर पडला असून पक्ष धर्माच्या मुद्द्यावर जास्त वेळ घालवत आहे,’ असं संघप्रिय गौतम यांनी म्हटलं होतं. तसंच पाच राज्यातील पराभवानंतर मोदी आणि शहांचा करिश्मा चालत नसल्याचं त्यांनी थेट म्हटलं होतं. एकीकडं मोदी जाहीर समारंभात भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेलं पहिलं सरकार असं सांगतात. त्याचा अर्थ वाजपेयी यांची तीन वेळा आलेली सरकारं भ्रष्ट होती. त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग लागलेला होता, असा होतो. आता मोदी यांच्याजवळ बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’च्या काळातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याचा विडा उचलून सत्तेवर आलेल्या मोदी यांनी भष्टाचाराच्या आरोपावर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालण्याचं व्रत घेतलं आहे. अरुणाचल प्रदेशातील 450 कोटींच्या जलविद्युत प्रकल्पाच्या गैरव्यवहारात अडकलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांची भक्कम पाठराखण मोदी यांनी केली. भ्रष्टाचाराचा आरोप करणा-यांना जोड्यानं मारण्याची भाषा त्यांनी केली. मोदी आणि भाजप यांनी कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना मंत्रिमंडळात सामावून घेतले आहे, हे यावरून स्पष्ट व्हावं. राफेलमध्ये काहीतरी दडवण्याचा प्रयत्न होतो आहे. आलोक वर्मा यांना हटविण्यामागं दुसरं काहीच कारण नाही. न्या. पटनायक यांनीच वर्मा यांना हटविण्यात घाईगडबड केल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. राजभर, अनुप्रिया पटेल हे मित्रपक्षाचे नेते नाराज आहेत. अशा स्थितीत एक एक नेता बाहेर पडणं हे बुडत्या जहाजाची आठवण करून देणारं आहे.