Breaking News

भंडार्‍याने नहाली अवघी पालनगरी


काशिळ (प्रतिनिधी) : येळकोट येळकोट जय मल्हार.., सदानंदाचा येळकोट, खंडोबाच्या नावानं चांगभलं अचा जयघोष आणि भंडारा खोबर्‍याच्या अक्षतांसह वेद-मंत्रांच्या जयघोषात व सुमारे आठ लाख भाविकांच्या साक्षीने शुकवारी सायकांळी साडेपाचच्या वाजण्याच्या सुमारास गोरज मुहूर्तावर, मोठ्या भक्तभावाच्या वातावरणात महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीश्रेत्र पाल, (ता. कर्‍हाड) येथील श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांचा राजेशाही विवाह सोहळा पार पडला.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मुख्य मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या मुख्य चौकानजीक सर्व बाजूंनी बॅरिकेटस् लावल्याने मुख्य चौकात मिरवणुकीवेळी भाविकांची होणारी गर्दी आटोक्यात आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले, तर तारळी नदीपात्रातील दक्षिण बाजू भंडारा, खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरली होती. पालनगरीत खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबर्‍याच्या उधळणीने पिवळा धमक झाला होता. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे यंदा सुमारे सात ते आठ लाख भाविकांच्या अथांग जनसागरात कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडली.

खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काट्या, पालखीसह देवस्थानच्या आकर्षक रथातून मानकरीं यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. दुपारी तीनच्या सुमारास खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मानकरी देवाचे मुखवटे पोटावरती बांधून अंधार दरवाजाजवळ आले. या ठिकाणी ते रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणुकीस सुरूवात झाली.

मानकर्‍यांच्या फुलांनी सजवलेल्या अबदागिरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या, पालखी, मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेऊन निघालेले मानकरी, अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबर्‍यांची उधळण करीत सदानंदाचा येळकोट.., घे येळकोट येळकोट.., जय मल्हार,चा जयघोष करीत देवाचे दर्शन घेतले.

तारळी नदीच्या तीरावर लाखो भाविकांनी गर्दी केली होती तर पाल नगरीचे आसमंत भंडारा खोबर्‍याच्या उधळणीने पिवळा धमक झाले होते. मंदिर परिसर, वाळवंटीतून ही शाही मिरवणूक हळू हळू पुढे सरकत मारुती मंदिरमार्गे सायंकाळी सहाच्या सुमारास बोहल्याजवळ आली. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले व देवाचे मुख्य मानकरी यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपारीक पद्ध्तीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडला.