Breaking News

श्रीगोंद्यात भाजपला खिंडार


नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी पोटे यांची उमेदवारी जाहीर
भोस, यांच्यासह दोन नगरसेवक आघाडीत दाखल


श्रीगोंदा/प्रतिनिधी
श्रीगोंदे, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सकाळी राजकीय भूकंप घडला. भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, नगरसेवक सतीश मखरे व नगरसेवक गणेश भोस यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश केला. छत्रपती कॉलेजवर झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रवेश पार पडला. तर नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी मनोहर पोटे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. अशी घोषणा अण्णासाहेब शेलार यांनी यावेळी केली.
छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रवादी व काँग्रेसने सोमवारी सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, सतीश मखरे अचानक दाखल झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी या प्रवेशाची घोषणा केली. तर राजेंद्र नागवडे, आ.राहुल जगताप यांनी भोस व पोटे यांचे स्वागत केले.
नगराध्यक्ष मनोहर पोटे म्हणाले, राजेंद्र नागवडे यांनी मला नगराध्यक्ष करण्यासाठी मोठे सहकार्य केले. मी नगराध्यक्ष झाल्यापासून पार्टीत कुरघोडीच राजकारण सुरू झालं. मी कसा बदनाम होईल हे आप्तस्वकीयांनी सुरू केलं. त्यामुळे अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा निर्णय आपण घेतला. यावेळी बोलताना बाबासाहेब भोस म्हणाले, राज्यात भाजप सरकारने एकही सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा घेऊन एकही काम केलं नाही. या सरकारकडून सामान्य माणूस भरडला जाता आहे. त्यामुळे भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. लवकरच इतरही नगरसेवक आमच्या सोबत येणार आहे. याप्रसंगी आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, ऍड. सुभाष डांगे आदी नेत्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.