Breaking News

कंदी पेढ्याच्या सातार्‍यात बहरली पुस्तकांची जत्रा
सातारा : अनोख्या गोडीचा कंदी पेढा, तरतरी आणणारा जर्दा, आलं आणि शिवस्वराज्याची राजधानी अशी ओळख असणार्‍या कृष्णाकाठच्या सातार्‍यात पुस्तकांची अनोखी जत्रा बहरली असून खास सातारा पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणार्‍या 20 व्या सातारा ग्रंथमहोत्सवास ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथविक्रीचे नवनवे उच्चांक निर्माण करणार्‍या या उपक्रमामुळे सातार्‍यात साहित्यप्रेमींची मांदियाळीच अवतरली आहे.

येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शुक्रवारपासून सलग चार दिवसांचा हा साहित्यीक उपक्रम सुरू झाला आहे. सुमारे 100 हून अधिक ग्रंथविक्रेत्यांनी पुस्तक विक्रीचे स्टॉल्स उभारले असून मुख्य सभामंडपात प्रकट मुलाखत, कथाकथन, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आदींच्या माध्यमातून कला, साहित्य, संस्कृतीची उपासना करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शानदार समारंभात या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. त्या वेळी खासदार उदयनराजे भोसले, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, राजकुमार निकम, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीश चिटणीस, वि. ना.लांडगे, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, प्रा. साहेबराव होळ, सुनिताराजे पवार, सुनिता कदम यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

उदघाटनपर भाषणात डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ग्रंथ हे गुरू, माता, पिता आणि उर्जा, प्रयोगशाळासुध्दा असते. पुस्तके ही माणुसकी जपणारी संस्कृती असते. विविध जाती धर्माचे ग्रंथ एकाच कपाटात शेजारी शेजारी असतात, मात्र सजीव मानव प्राणी मात्र जाती धर्माच्या भिंती घालून आपापसात वैरभाव जपताना दिसतो. या पार्श्‍वभूमीवर ग्रंथसंस्कृती जपणारा, वाढविणारा आणि घराघरापर्यंत ग्रंथसंपदा नेणारा सातारा ग्रंथमहोत्सव संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहे. गावोगावी होणारी लहान मोठी साहित्य संमेलने आणि ग्रंथमहोत्सवाचे आयोजन सातारा ग्रंथमहोत्सवाच्या प्रेरणेतूनच होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातत्य जपणार्‍या या साहित्यसंस्कृती वृध्दीगत करणार्‍या उपक्रमाचे कौतुक करतानाच ग्रंथखरेदीच्या माध्यमातून बळ देण्याचे कामही तितक्याच ताकदीने होत आहे, ही बाब निश्‍चीतच स्तुत्य आहे.