Breaking News

वृक्षतोडीचा खल आज सातारा पालिका सभेत रंगणार


सातारा (प्रतिनिधी) : वृक्ष संवर्धनाच्या शासन मोहिमेला हरताळ फासण्याचे काम पालिकेत अधिकारी राजरोस करीत आहेत. वृक्ष कमिटी नावाला असून विनापरवानगी झाडांची कत्तली होणार असतील तर बैठकांचा फार्स कशाला, असा मुद्दा उपस्थित करून आठ दिवसांपूर्वी स्थगित केलेली वृक्ष कमिटीची बैठक आज नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. 

पालिका हद्दीतील झाडे तोडणे आणि कायद्यातील तरतुदींप्रमाणे वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करणे हा वृक्ष कमिटीचा उद्देश असताना आरटीओ, सातारा आणि व्यंकटपुरा येथे बेकायदेशीर झाडांची कत्तल करण्यात आली असून त्याबाबत अद्याप फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वृक्ष विभाग प्रमुख भाऊसाहेब पाटील मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप समितीतील सदस्यांनी मागील बैठकीत केला होता. कायद्यात तरतूद नसताना झाडांची कत्तल करणार्‍यांना नोटीसा देण्याचे उद्योग अधिकारी करीत असून त्यामुळे कमिटी सदस्य टीकेचे धनी होत असल्याचे वास्तव बहुतांश सदस्यांनी नगराध्यक्षांसमोर मांडले होते. एकंदरीत वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना आज होत असलेल्या बैठकीत अधिकारी रडारवर असणार, हे निश्‍चित झाले आहे.