पुसेगावच्या कृषी प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद


खटाव (सुजाता शिंदे यांजकडून) : पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास सालाबादप्रमाणे यंदाही सर्वच स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. यावर्षीच्या कृषी प्रदर्शनात जलयुक्त शिवारपासून ते शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान व शेतीशी निगडीत असलेल्या व्यवसायासंबंधीच्या माहितीचे परिपूर्ण दालन यात्रेकरूंसाठी उपलब्ध करून दिले होते. जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी, व्यावसायीक, महिला व विद्यार्थ्यांमध्ये हे प्रदर्शन पाहण्यासाठी, जलसंधारण, शेतीविषयक नियोजनबध्द माहिती मिळवण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून येत होता.

पुसेगाव येथील यात्रा स्थळावरील मैदानावर श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्सो ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध गावात केलेल्या जलसंधारणांच्या कामांची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. यामधून पाणलोट विकासाचे महत्व पटवून देण्यात येत होते. विकसित पाणलोटामध्ये पावसाचे पडणारे व वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यात कशी मदत होते हा संदेश देण्यात आला होता. यामध्ये विविध गावांनी सिमेंट बंधारे, समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, अनघड दगडी बांध, माती नाला बांध, ओढे, नाले खोलीकरण व रुंदीकरण यांच्यामाध्यमातून केलेल्या कामातून धावणर्‍या पाण्याला चालायला शिकवले. चालणार्‍या पाण्याला थांबायला शिकवले व थांबलेल्या पाण्याला मुरायला शिकवल्याच्या गाथा लक्षवेधकपणे मांडण्यात आल्या होत्या.
याशिवाय ट्रॅक्टर, सारा यंत्र, घरघंटी, भांगलण, पॅावर टिलर, कडबा कुट्टी, गवत कापणी, आले, बटाटा काढणी यंत्र, रोटावेटर, व्हिजेटेबल अँड फ्रूट मल्टिकटर आदी आधुनिक कृषी अवजारे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. शेतकरी नवीन तंत्रज्ञानाची पाहणी करून खरेदी वा बुकिंग करताना दिसत होते. प्रगतशील शेतकर्‍यांंनी नाविन्यपूणतेने पिकवलेल्या फळाफुलांचे विविध उत्पादनांचे नमुने ठेवण्यात आले होते. विविध कंपन्यांचे कीटकनाशके, खते, बी-बियाणे, उद्योग प्रक्रिया, उपकरणे या प्रदर्शनात उपलब्ध झाले होते. महिली बचत गटांनी खाद्यपदार्थ, हस्तकला व सौंदर्य प्रसाधने यांचे स्टॅाल लावले होते. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget