Breaking News

श्री समर्थ बैठकीत अध्यात्मातून समाजप्रबोधनाचे कार्य : काटकर


सातारा (प्रतिनिधी) : श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून सुदृढ, निरोगी, निष्पाप व वैचारिक अधिष्ठान असलेली पिढी घडविण्याचे कार्य थोर समाजप्रबोधनकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले. सशक्त समाजमन घडविणारे संपूर्ण जगातील एकमेव ठिकाण म्हणजे श्री समर्थ बैठकच होय. अध्यात्मातून समाजप्रबोधनाचे कार्य खर्‍या अर्थाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान करत आहे. त्यामध्ये युवकांचा सहभाग देखील लक्षणीय आहे, असे प्रतिपादन जि.प.च्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर यांनी केले.

संभाजीनगर, ता. सातारा येथील ग्रामपंचायत व महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरण कार्यक्रमात श्री. काटकर बोेलत होते. यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, जि. प. सदस्या अर्चना देशमुख, सरपंच दीपाली पंडित, माजी पं.स. सदस्य आनंदराव कणसे, उद्योजक अरूणराव कणसे, ग्रा.पं. सदस्य जयवंत मोरे, नितीन शिंदे, सतीश माने, ग्रामविकास अधिकारी एन. बी. बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अर्चना देशमुख म्हणाल्या, प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजप्रबोधन तसेच अनेकविध सामाजिक उपक्रम हे गौरवास्पद आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणुकीतून दिली जाणारी शिकवण अज्ञान नष्ट करणारी आहे. निश्‍चितच पुढील पिढीसाठी या शिकवणुकीचा फायदा होत आहे. 


जगभरात इतिहास घडविणारे महास्वच्छता अभियान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वीरित्या संपन्न झाले आहे, असे मत ग्रामपंचायत सदस्य जयवंत मोरे यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील नागरीक व श्री समर्थ बैठकीचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.