Breaking News

दुधाळ जनावरांची बोगस यादी रद्द करण्याची मागणी; कोलाराच्या युवकाचे पंचायत समितीसमोर उपोषण


चिखली (प्रतिनिधी): चिखली पंचायत समिती अंतर्गत असलेल्या पशुसंवर्धन विभागामध्ये 2017-18 या वर्षासाठी मागवलेल्या विशेष घटक योजने अंतर्गत दुधाळ जनावरांच्या अर्जामधील लाभार्थ्याची निवड यादी बोगस आणि भ्रष्टाचार युक्त असल्याचा आरोप करत त कोलारा येथील नितीन मघाडे याने चिखली पंचायत समिती समोर 14 जानेवारी पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे वाटपासाठी मागवलेल्या अर्जामध्ये कोलारा येथील नितीन मघाडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या मूळ फाइल मधील नमुना 8 अ हा जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आला. त्यामुळे लाभार्थी वंचित राहिला असल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे.

याबाबत रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून गट विकास अधिकारी चिखली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलडाणा यांना वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा आतापर्यंत कसली चौकशी व कार्यवाही केलेली नाही लाभार्थ्याला विशेष बाब म्हणून नवीन फाइल करण्यास सांगितले व नंतर होत नाही म्हणून सांगितले. लाभार्थ्याला एक प्रकारे लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तरी फाइलमधली आठ अ जाणीवपूर्वक गहाळ करून लाभापासून वंचित ठेवणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलडाणा यांच्याकडे 8 जानेवारी रोजी एका निवेदनाद्वारे केली होती. त्यामध्ये नमूद केल्यानुसार 14 जानेवारी पर्यंत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने उपोषणास सुरुवात केली आहे.