Breaking News

शिवसेनेचं प्रेम झिडकारलं म्हणून... राष्ट्रवादी व भाजपच्या लफड्याचा सेनेकडून बोभाटा


अहमदनगर/प्रतिनिधी
नगर मनपाच्या महापौर निवडणुकीत भाजपला धुळ चारण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याकडे युतीचा हात मागीतला होता. मात्र, त्यांनी ऐनवेळी दगाबाजी केली. अशी कबुली शिवसेनेचे रामदास कदम यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजप यांची लफडेबाजी काढणार्‍या शिवसेनेचा खरा चेहरा उघडा पडला आहे. अर्थात शिवसेनेचं प्रेम राष्ट्रवादी व काँग्रेसने झिडकारलं म्हणून भाजपच्या लफड्याचा बोभाटा शिवसेनेकडून होत आहे. अशी टिका राजकीय वर्तुळात होत आहे.
खरे पाहता भाजपची जिरविण्याच्या नादात शिवसेनेला सत्ता गमवावी लागली आहे. याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व रामदास कदम यांनी उघड केले आहे. फडणविस म्हणाले, आम्ही रामदास कदम यांच्याकडे युतीसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय सोडला होता. फडणविस यांच्या उत्तरानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला. भाजपचे व राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध चव्हाट्यावर मांडले. शुद्ध चारित्र्याच्या अविर्भावात शिवसेना जास्तच बोलून गेली. मात्र, दोन दिवस जातात कोठे, नाहीतर रामदास कदम यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. खरेतर भाजपला सत्तेतून दुर ठेवण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याशी संपर्क केला होते. मात्र, दगडापेक्षा वीट मऊ असे समजून आघाडीने शिवसेनेचे प्रेम नाकारले आणि भाजपला साथ दिली. हे कदमांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.
कदम याच्या खुलाशाने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकतर पक्षश्रेष्ठींचा आदेश डावालुन आ. पिता-पुत्रांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्यावर कारवाई होणार, यावर शरद पवार यांनी संकेत दिले आहे. मात्र, महापौर निवडणुकीत अलिप्ततेचे धोरण स्विकारण्यापेक्षा शिवसेनेला धडा शिकविण्याची संधी राष्ट्रवादीने सोडली नाही. येणारी आमदारकी सोपी जावी, केडगाव हत्याकांडात केलेल्या आरोपांचा वचपा निघावा आणि बरेच काही गुपित या युतीत दडले आहे. काही झाले तरी. कदमांच्या खुलाशामुळे राष्ट्रवादीची भूमिका अनेकांना पटण्याजोगी वाटू लागली आहे. कारण शहरात शिवसेनेला मोठे करण्यापेक्षा भाजपला मोठे करणे राष्ट्रवादीसाठी राजकीय दृष्ट्या कधीही परवडणारे आहे. हे निर्वीवाद सत्य आहे.


चौकट
दुसर्‍यांदा शिवसेना तोंडघाशी पडली...
छत्रपती शिवरायांच्या नावाचे भांडवल करुन श्रीपाद छिंदम याच्यावर शिवसेनेने चिखलफेक केली. मात्र, शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी चक्क छिंदमच्या मताची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड पडला. तर राजकीय व्याभिचारी शब्दात नैतिक अनैतीक शब्दांचा आधार घेत शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसवर टिका केली. मात्र कदमांनी शिवसेनेला सगळ्यात मोठा घरचा आहेर दिली आहे. त्यामुळे शिवसेना दुसर्‍यांदा तोंडघाशी पडली


चौकट
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळ
राष्ट्रवादी व काँग्रेसला टाला मारताना कदम म्हणाले, त्यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत. मात्र, हाच पलटवार शिवसेनेवर झाला आहे. भाजपचा बिमोड करण्यासाठी आघाडीशी गुप्त चर्चा करता, महापौर पदासाठी शिवद्रोही म्हणार्‍या छिंदमला अंतर्गत मतदान करण्यास विनंती करता, सत्ता स्थापन करण्यासाठी ज्यांच्यावर टिका करतात त्यांचेच कौतुक करतात. त्यामुळे नक्की खायचे व दाखवायचे दात वेगळे कोणाचे आहे. असा प्रश्‍न शिवसेनेलाच विचारा. असा सवाल सोशाल मीडियावर सुरू आहे.


चौकट
ते सर्व खोटे बोलत आहेत...
मनपात महापौर युतीसाठी मी गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही. आमच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य कोणीही संपर्क साधला नाही. त्यामुळे सर्व खोटो बोलत आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिली.