Breaking News

ज्ञानामुळे भारत भविष्यात विश्‍वगुरू बनेल : डॉ. विजय भटकर


पुणे : जगात भारताची ज्ञानामुळे ओळख आहे. या देशात सर्वात प्राचिन नालंदा विद्यापीठ आहे. येथून सुख, समाधान आणि मानवता कल्याण या ज्ञानाचा प्रसार होता. सर्व धर्मांचे धर्मग्रंथ आणि वेद हे ज्ञानाचे भांडार आहे. त्यामुळे देशातील सर्व विद्यापीठात ज्ञानाची शिकवण देणार्‍या ग्रंथालयाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जागतिक किर्तीचे संगणक शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे व विश्‍व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या 156 व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित 21 व्या शतकात भारत विश्‍व गुरू होणार या विषयावर विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली विश्‍व शांती प्रार्थना सभागृहात आयोजित तीन दिवसीय ज्ञान-जागर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक स्वामी राधिकानंद सरस्वती या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. विजय भटकर म्हणाले, वर्तमान विज्ञान युगात डेटा सायन्स या विषयाला अत्यंत महत्व आहे. त्याला ही ज्ञान म्हटले जाते. प्राचीन युगात भारताची ओळख ग्रंथालय म्हणजे ज्ञानामुळेच होते. त्यामुळेच भारतातील सर्व विद्यापीठात आणि महाविद्यालयात ग्रंथालयाची आवश्यकता आहे. भारत हा ज्ञानाचा भांडार म्हणून ओळखला जातो. 21 व्या शतकात भारत विश्‍वगुरू होणार हा स्वामी विवेकानंद यांचा संदेश सार्थक ठरविण्यासाठी सर्वांना कर्माधिष्ठित होण्याची गरज आहे. सर्वांच्या समस्यांचे समाधान ज्या मार्गाद्वारे होते, त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे देशाची ओळख होय, त्यामुळे सर्वांनी ज्ञानासाधक होण्याची आवश्यकता आहे. भारताची ओळख संत, आध्यात्मिक गुरू आणि ग्रंथालय व इतर ज्ञानाच्या संस्थांच्यामाध्यातून होते. हे विश्‍वची माझे घर आहे. वेदांमध्ये कसे जगावे अथवा कसे जगू नये यांचे ज्ञान आहे. बायोलॉजी हा सर्वांसाठी महत्वाचा विषय आहे. ज्ञानेश्‍वरी जगाला सुख, समाधानाचे मार्ग दाखवते. 21 व्या शतकात जगाला मार्गदर्शन करणारा देश म्हणून उदयाला येईल. गुरू आपल्या शिष्यांना घडविण्याचे कर्म करतात, तसेच भविष्यात भारत ज्ञानाद्वारे जगातील सर्व देशांना विकासाच्या आणि प्रगतीच्या पथावर नेण्याचे कार्य करेल.