Breaking News

खंडाळा तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचा अर्धनग्न मोर्चा


खंडाळा तहसील कार्यालयापासून प्रारंभ : मंत्रालयावर धडकण्याचा निर्धार

लोणंद, (राहिद सय्यद) : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 1, 2 व 3 मधील प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी त्यांच्या न्याय हक्कसाठी खंडाळा तहसिल कार्यालयापासून शनिवार, दि. 12 रोजी दुपारी 12 वाजता अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. हा मोर्चा घोषणा देत मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यात गेल्या काही वर्षापासून औद्योगिक वसाहतीची उभारणी करताना शिवाजीनगर, मोर्वे, धनगरवाडी, केसुर्डी, भादे यासह परिसरातील शेतकर्‍यांच्या जमीनी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथील भूमिपूत्र भूमिहिन झाले आहेत. त्यांना या जमीनीचा योग्य मोबदलाही मिळाला नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या मालकीच्या जमीनीच्या 7/12 वरील एमआयडीसीचे शिक्के काढण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. मात्र, त्याकडे प्रशानाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शेतकर्‍यांचा हा प्रश्‍न सधारण सन 2008 पासून प्रलंबित आहे. आजचा मोर्चा मुंबईत मंत्रालयावर जावून धडकणार आहे. तसेच 26 जानेवारी 2019 रोजी परिसरातील शेतकर्‍यांनी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे. याबाबत शेतकर्‍यांनी प्रशासनाला कल्पना दिलेली आहे. 

प्रकल्पग्रस्तांची भूसंपादनात फसवणूक झाली आहे. सरकारच्या डोळ्यावरील गांधारीची पट्टी दूर करण्यासाठी या अन्यायाविरोधात शेतकर्‍यांनी अर्धनग्न मोर्चा काढला आहे.
हा अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी किसान मंचचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी दिला होता. त्यानुसार आज या आंदोलनास सुरूवात झाली. खंडाळा तालुक्यातील प्रकल्पबाधित शेकडो शेतकर्‍यांनी न्याय हक्कासाठी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला असून आपणास संपूर्ण मोबादला व योग्य न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही, असा निर्धार प्रकल्पबाधितांनी या मोर्चाच्या प्रारंभी व्यक्त केला.