Breaking News

पोलीस निरीक्षकांकडून वकिलाला शिवीगाळ व धमकी; संगमनेर वकील संघाचे कामबंद आंदोलन

संगमनेर/प्रतिनिधी
’सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’असे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र पोलीसच जेंव्हा सामान्यांचे रक्षण करण्याऐवजी त्यांची अवहलेना करून त्यांना अपमानास्पद वागणूक देत असेल तर कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणार्‍यांकडून सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा करावी. असाच प्रकार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बघायला मिळाला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एका खटल्यासंदर्भात गेलेल्या वकील आणि त्याच्या पक्षकाराला संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.आर. पाटील यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. यातील वकील सचिन काशिनाथ दुबे यांनी पोलीस उपअधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 
याबाबत अ‍ॅड.सचिन दुबे यांनी केलेल्या तक्रारीवरून अधिक माहिती अशी कि, एका न्यायालयीन खटल्याच्या निवाड्यात सिंधुबाई पोपटराव बोंतले यांना त्यांच्या जमिनीचा हिस्सा न्यायालयाकडून निश्‍चित करुन देण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडून यासंदर्भातील कायदेशीर पुर्तता करुन घेतली. वाटपाच्या अनुषंगाने तहसीलदारांनी भुमी अभिलेख खात्याचे उपअधीक्षक, तालुका पोलिस निरीक्षक, मंडलाधिकारी, कामगार तलाठी यांना यासंदर्भातील प्रती पाठवल्या होत्या. डुबे यांच्या पक्षकारासदेखील या पत्राची प्रत मिळाल्यानंतर सोमवारी सिंधुबाई बोतले यांना घेऊन ते तालुका पोलिस ठाण्यात गेले होते.

पोलिस ठाण्यात एका महिला पोलिस कर्मचार्‍याकडून त्यांना दुसर्‍या एका पोलिसाची भेट घेण्यास सांगण्यात आले. मात्र, संबधीत कर्मचार्‍याची भेट न झाल्याने डुबे ठाणे अंमलदाराच्याकडे गेले. तेथे महेंद्र सहाणे नावाच्या कर्मचार्‍याने त्यांना पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांची भेट घेण्यास सांगितले. निरीक्षक पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी तहसीलदारांची अक्कल काढत त्यांना काही समजत नाही, हे पत्र मला द्यायचे काय? त्याला ते नगरच्या एसपींना पाठवायला सांग, असे सांगत वकील डुबे यांना तु गेटआऊट हो, तुझ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याची कारवाई करेल, मी फार वकील बघीतले, काहीपण कागद घेऊन येतात. असे म्हणत शिवीगाळ केली. कॉलर पकडत ठाणे अंमलदाराच्या कक्षापर्यंत आणून तेथील कर्मचारी व जमलेल्या लोकांसमोर जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. आणि वकील जर पुन्हा पोलिस ठाण्यात आले तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा. असे कर्मचार्‍यांना फर्मान सोडत मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे उपअधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात डुबे यांनी म्हटले आहे. यावेळी संगमनेर वकील संघटनेचे पदाधिकारी याबाबत उपअधीक्षकांशी चर्चा करायला गेले असता त्याठिकाणी वाद होऊन वकील संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. वकीलांनी आता यासंदर्भात गृह मंत्रालयाचेच दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

घटने संदर्भात वकील संघटनेचे निवेदन मिळाले आहे. एकतर्फी बाजु ऐकून लगेच निर्णय घेता येत नाही. दोन्ही बाजु पडताळल्या जातील. चौकशीत तथ्य आढळले तर पोलिस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला जाईल.
-अशोक थोरात, पोलिस उपअधीक्षक