Breaking News

औषध विक्रेत्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन; ऑनलाईन औषध विक्रीचा निषेध


नगर/प्रतिनिधी
सरकारने ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी दिली असून, त्याद्वारे नागरिक ऑनलाईन औषधेही विकत घेत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे. या निषेधार्थ अहमदनगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगस्ट असोसिएशनच्यावतीने सरकारने ऑनलाईन विक्री त्वरित थांबवावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. संपूर्ण देशात सुमारे साडेआठ लाख औषध विक्रेत्यांनी एकाचवेळी हल्लाबोल आंदोलन आपआपल्या भागात केले. अहमदनगर जिल्ह्यातीलही सर्व औषध विक्रेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. 

यावेळी बोलतांना अजित पारख म्हणाले की, देशात बेकायदेशीरपणे ऑनलाईन औषध विक्री सर्रास सुरु आहे. सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया, होडिर्ंग्जद्वारे तर्कहीन जाहिराती ऑनलाईन कंपन्या करत आहेत. चुकीची औषधे घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होत आहे. या जाहिरातींविरोधात कडक कारवाई सरकारने करावी. सरकारला जाग येण्यासाठी संपूर्ण भारतात औषध विक्रेत्या संघटनेने आज हे आंदोलन छेडले आहे. ऑनलाईन औषध विक्री सरकारने त्वरित थांबविली नाही तर सरकार विरोधात बेमुदत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू. यावेळी चेतन कर्डिले म्हणाले की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक गैरप्रकार होत आहेत. गर्भनिरोधक गोळ्या, झोपेच्या गोळ्या, नशा येणारे औषधे सर्रासपणे ऑनलाईन मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहेत. याच्या निषेधार्थ नगर जिल्हा औषध विक्रेते संघटनेने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फुर्त मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी अजित पारख, शशांक रासकर, चेतन कर्डिले, बलदोटा, संजय वाव्हळ आदिंसह सर्व तालुक्यांचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने औषध विक्रेते व्यवसायिक यावेळी उपस्थित होते. या मोर्चाला एम.आर.संघटनेनेही पाठिंबा देऊन मोर्चात सहभाग घेतला. यावेळी दत्ता गाडळकर, विलास शिंदे, सूर्यकांत भुजाडी, शैलेंद्र औटी, अरुण सावंत, मंदार पहाडे, सुरेश तोरडमल, प्रशांत गाडेकर, रमेश सावंत, अमित तिवारी, विशाल शेटीया, ओम नारंग, अशितोष कुकडे, आदेश शाह, शैलेश साबळे आदी पदाधिकारी हल्लाबोल आंदोलनात सहभागी झाले होते.