Breaking News

शिवसेनेच्या टीकेला महत्व न देण्याचा भाजपचा निर्णय


कराड (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने केलेल्या टीकेला महत्व द्यायचे नाही, असा निर्णय भाजपने घेतला असून आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व 48 मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारीही केली आहे. कोणतीही आघाडी किंवा महाआघाडीशी दोन हात करण्याची तयारी पक्षाने ठेवली असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. 

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत माहिती देताना भंडारी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील गरिबांना नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे उचललेले पाउल हा देशातील सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक आणि क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शिख, जैन असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना प्रगतीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास या धोरणाच्या अंमलबजावणीस बळ मिळणार आहे. समाजाच्या सर्व स्तरातील वंचित घटकांना विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय जनता पक्ष सरकार वचनबध्द आहे. मोदी सरकारने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना बँक खाते, गॅस कनेक्शन, शौचालये, वीज पुरवठा, आरोग्य सेवा यासाठी यशस्वी पध्दतीने काम केले आहे. आता आर्थिक आधारावर आरक्षण लागू करुन सरकारने गरिबांना विकास करण्यासाठी अधिक संधी निर्माण केली आहे. 

भंडारी यांनी पुढे सांगितले की, अनुसूचीत जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांना आरक्षण आहे. इतर समाजघटकांमधील गरिबांनाही अशाच प्रकारे विकासाची संधी मिळाली पाहिजे, अशी अनेक वर्षांपासून प्रलंबीत मागणी आहे. या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले व रामविलास पासवान यांच्यासारख्या अनुसूचीत जातींमधील मोठ्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. आर्थिक आधारावर आरक्षणाची गेली सत्तर वर्षे असलेली मागणी पूर्ण करण्याचे ऐतिहासीक काम मोदी सरकारने केले आहे. 

हे आरक्षण सर्व कसोट्यांवर टिकेल याची काळजी सरकार घेईलच. परंतु सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनीही त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.