Breaking News

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटपश्रीरामपूर/प्रतिनिधी           
माजी मंत्री स्वर्गीय गोविंदराव आदिक यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध वसतीगृहातील मुलांना ब्लँकेट, फळे व वस्तूंचे वाटप आल्या. कार्यक्रमात आदिकांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. 
स्वर्गीय आदिक यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवनमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. शहर व तालुक्यातील अनेकांनी त्यांना अभिवादन केले. अशोकनगर येथील रामराव आदिक पब्लिक स्कूलमध्ये आदिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सर्व कार्यक्रमांत अविनाश आदिक, अनुराधा आदिक, पुष्पलता आदिक, सुजाता मोरे, अंजली पुणातर, केशवराव आदिक, सुभाष आदिक, बबनराव आदिक, रिया राजीय पुणातर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अंधसेवी संस्थेच्या अंध शाळेत मुलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. आदिक यांनी या संस्थेला भरीव आर्थिक मदत केल्याचे यावेळी विश्‍वनाथ औटी यांंनी सांगितले. यावेळी वैभव चुडीवाल, विना दळवी यांची भाषणे झाली. मुकबधिर विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात आदिक यांनी संस्थेला केलेल्या मदतीचा उल्लेख सुरेश बनकर यांनी केला. यावेळी अनिल पांडे यांचे भाषण झाले. मुख्याध्यापक कल्याण होण यांनी आभार मानले. बहुजन शिक्षण संघाच्या शंभुक विद्यार्थी वसतीगृहात मुलांना ब्लँकेट व फळे वाटण्यात आली. नगराध्यक्षा आदिक यांनी यावेळी आदिक यांच्या आठवणी सांगितल्या. आदिक यांची शैक्षणिक कालखंडातील वाटचाल ही अत्यंत खडतर होती. ते कष्टातून शिकले. कष्टातूनच पुढे गेले. त्यामुळे कष्टकरी व दुबळ्या वर्गाबद्दल त्यांना सहानुभूती होती. विद्यार्थ्यांना ते नेहमीच मदत करत. त्यामुळेच त्यांचा स्मृतिदिन हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अविनाश आदिक यांनी संस्थेचे संस्थापक दादासाहेब रुपवते व प्रेमानंद रुपवते यांचा आदिकांशी स्नेहाचा संबंध होता. दादासाहेब रुपवते हे त्यांना मार्गदर्शन करत. आदिकांना रुपवते यांनी आयुष्यभर साथ केली. त्याचे विस्मरण होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सरकारकडून अल्प मानधन मिळते. ही रक्कम वाढविण्यासाठी पुढाकार घेऊ. सरकारकडे प्रश्‍न मांडू, असे आदिक यांनी यावेळी सांगितले. कविता दिवे यांच्या हस्ते पुष्पाताई आदिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वसतीगृहाचे प्रमुख अशोक दिवे यांनी आभार मानले.