Breaking News

तुमचे दिवस आता भरले...! ठाकरे यांची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका


बीड/ प्रतिनिधीः 
बाहेरच्या देशांत सातत्याने फिरत असल्यामुळे काहींना देश बदलत असल्याचा भास होतो. त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत फोटो काढून मिरवण्यापेक्षा माझ्या शेतकर्‍याचे आसू पुसल्याचा फोटो काढावा, असा उपरोधिक सल्ला देताना आता तुमचे दिवस आता राहिलेत तरी किती? असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफानी प्रहार केला. 


ठाकरे आज एक दिवसाच्या मराठवाडा दौर्‍यावर आहेत. उद्धव यांची बीडमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी कर्जमाफी, शेतकरी, राम मंदिर, राफेल आदी मुद्यांवरून मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांच्यावर टीकेचा प्रहार करताना ते म्हणाले, की संधीसाधू येती घरा, समजा निवडणुका आल्या. राफेल सारखाच पीकविमा योजनेतसुद्धा घोटाळा आहे. घोषणांमुळे जनतेचे पोट भरणार नाही. खोटे बोलून अन्नदात्याची फसवणूक करून नका. ना तुम्ही शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवू शकला ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकला, आम्ही मन की नाही तर जनची बात करतो. जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिले? असा सवाल ठाकरे यांनी विचारला.

ठाकरे म्हणाले, की दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. स्वस्तामध्ये घर देईन असे बोलून घर मिळत नाही. भाषणाच्या पावसाने पाण्याचा हंडा भरत नाही. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. सरकारी यंत्रणेच्या सुस्त अजगराला ढोसकण्यासाठी मी फिरतोय. युतीच्या चर्चेआधी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवा. रोज वेगवेगळ्या देशात जाता आणि म्हणता देश बदल रहा है. पण देशवासीयांची परिस्थिती काही बदलत नाही. 

युतीची चर्चा गेली खड्ड्यात

एकीकडे राज्यात शिवसेना-भाजपची युती होणार, की नाही यावरून चर्चा सुरू असताना ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका करताना युतीची चर्चा गेली खड्ड्यात असे म्हटले आहे. पहिले माझ्या शेतकर्‍याचे काय करता ते बोला, अशी विचारणा त्यांनी केली. 

गाजर दाखवा पथक!

केंद्रीय पथक येऊन गेले, तुमच्या हातात काही मदत पडली का, अशी विचारणा उपस्थित लोकांना करताना त्यांनी नाही म्हणताच मग ते लेझिम पथक होते का बँजो पथक? असा टोला त्यांनी लगावला. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक काही कामाचे नाही, नुसतेच गाजर दाखविण्याचे काम आहे अशी टीका ठाकरे यांनी केली.

राम शिंदेंना कसाईवाड्यात सोडा

काही दिवसांपूर्वी राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी चारा छावण्यासंबंधी बोलताना चारा नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा असे वक्तव्य करत वाद निर्माण केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे यांनी अशा नेत्यांना कसाईवाड्यात नेऊन सोडा, अशी अप्रत्यक्ष टीका केली आहे. ‘काही बातम्या पाहिल्या, की तळपायाची आग मस्तकात जाते. मध्यंतरी एक बातमी वाचनात आली की गुरांना द्यायला चारा नसेल, तर पाहुण्यांकडे नेऊन सोडा. असे जे बोलणारे मंत्री आहेत त्यांना कसाईवाड्यात नेऊन सोडलं पाहिजे. हा निर्लज्जपणा शिवसेनेला जमणार नाही’, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.