Breaking News

दुचाकीचोरांचे त्रिकूट म्हसवड पोलिसांकडून जेरबंदम्हसवड,(प्रतिनिधी): म्हसवड व परिसरातील तीन बुलेट व पाच मोटारसायकली आणि एक अ‍ॅक्टीव्हा स्कुटी अशा साडे सहा लाख रुपये किंमतीच्या दुचाकी चोरुन दुसर्‍याला विकणार्‍या दोन अल्पवयीन मुलांसह एका तरुणाच्या त्रिकुटाला म्हसवड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.

म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी दिलेली माहितीनुसार, म्हसवड, आटपाडी, दिघंची, दहिवडी हद्दीतील अनेक गावांतून दुचाकीचोरीचे अनेक प्रकार घडले होते. चोरीच्या दुचाक्यांच्या नंबरप्लेट बदलून त्या दुसर्‍या जिल्ह्यात विकल्याने याबाबत छडा लागत नव्हता. मात्र हवालदार अभिजित भादुले यांना खासगी खबर्‍यांकडून मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, शनिवार दिनांक 5 जानेवारीला रात्री उशिरा पर्यंती (ता. माण) येथे सपोनि मालोजीराव देशमुख, पोलिस नाईक कुंभार, सोरटे, कुर्‍हाडे, भादुले, धुमाळ, कवडे, मदने, किरण चव्हाण व पोलीसमित्र सनी शेटे यांनी सापळा रचून पर्यंतीमधील राहात्या घरातून इयत्ता 11वीतील एका मुलास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसक्का दाखवताच त्याने आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार त्याच गावातील समाधान शत्रुघ्न नरळे आणि अकलूज येथील प्रकाश रामचंद्र चोरमले या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा त्यांनी चोरीची कबुली दिली व चोरलेल्या गाड्यांविषयी सविस्तर माहिती दिली.