Breaking News

राफेलची संसदीय समितीमार्फत चौकशी करा; राहुल गांधी यांची मागणी; भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार


नवीदिल्लीः राफेलच्या करारात भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार करीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संरक्षण कराराचा तपास करणे हे न्यायालयाचे काम नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे; परंतु संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशी करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने कधीच म्हटलेले नाही, असे सांगत राफेल कराराची जेपीसीमार्फत चौकशी व्हायला पाहिजे, अशी जोरदार मागणी राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा संसदेत केली.

एका जेटची किंमत 526 कोटी रुपये असताना ती 1600 कोटी रुपये कशी झाली?, यासाठी जेपीसीमार्फत चौकशी व्हायला हवी, असे राहुल म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज राफेल करारप्रकरणी एक ऑडिओ टेप जारी केली. त्यावरून भाजप विरुद्ध काँग्रेस आमनेसामने आली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. राहुल यांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ऑडिओ टेपचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर भाजपच्या खासदारांनी बराच गोंधळ घातला. राफेल प्रकरणावरून राहुल आज पुन्हा आक्रमक पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता त्यांनी मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 126 जेट फायटर्स खरेदी करण्याऐवजी 36 जेट्स विमान खरेदी का केले?, एका जेटची किंमत 526 कोटी रुपये असताना ती किंमत 1600 कोटी रुपये कशी झाली?, हिंदुस्तान अ‍ॅरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्याकडे 70 वर्षांचा कामाचा अनुभव असताना नवख्या असलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कसे काय मिळाले?, अशी प्रश्‍नांची बरसात राहुल यांनी केली. 

राफेलप्रकणी आधी आम्हाला वाटायचे की, दाल में कुछ काला है...;परंतु आता वाटतेय की संपूर्ण दाळच काळी आहे, असेही राहुल म्हणाले. राफेल प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी व्हायला हवी. ती झाली तर सर्व काही स्पष्ट होईल. भाजपने जेपीसीच्या चौकशीला घाबरून जाण्याची गरज नाही, असा टोलाही राहुल यांनी लगावला.