Breaking News

रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात अळसुंदेत आंदोलन; गाव बंद आणि ठिय्या ; ग्रामस्थ आक्रमक


कुळधरण/प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राशीन-अळसुंदे-निंबे या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याच्या मुद्यावर अळसुंदे येथे ग्रामस्थांनी बंद व ठिय्या आंदोलन केले. प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा विमल अनारसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

अळसुंदे गावांमधून निंबे, राशीन या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे. साडेबारा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाकरिता सहा कोटीहून अधिक निधी मंजूर आहे. ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जात नसल्याने ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा निर्णय घेतला. सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. गावातील दुकाने बंद ठेवत ठिय्या देऊन रस्ता कामाची चौकशी तसेच दर्जेदार काम करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. या आंदोलनात रमेश अनारसे, शिवाजी देशमुख, रामभाऊ खामगळ, शिवाजी अनारसे, रामभाऊ दंडे, बाळासाहेब साळुंके, बाळासाहेब अनारसे, काकासाहेब अनारसे, जीवन साळुंके, किरण साळुंके, बाळासाहेब अनारसे, अनिल गाडे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले. अधिकारी पेशवे आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संतप्त ग्रामस्थांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर विभागाकडून कोणतीही चौकशी होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. अधिकार्‍यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.