Breaking News

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; नयनतारांचे मुखवटे घातल्याने गोंधळ


यवतमाळ/ प्रतिनिधीः
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात काही महिलांनी नयनतारा सेहगल यांचा मुखवटा लावल्याने गोंधळ उडाला. उद्घाटनाच्या वेळी सेहगल यांचे भाषण वाचावे, अशी मागणीही अनेकांकडून करण्यात आली; मात्र या मागणीला महामंडळाने स्पष्ट नकार दिला. आयोजकांनी या महिलांना समज देऊन सेहगल यांचे मुखवटे काढायला लावले. नयनतारा सहगल यांच्या अनुपस्थितीचा निषेध म्हणून रत्नागिरीतील आठ-दहा महिलांनी नयनतारा सेहगल यांच्या चेहर्‍याचा मुखवटा घालून संमेलन स्थळी प्रवेश केला.

दरम्यान, नयनतारा सेहगल यांचे उद्घाटक म्हणून आमंत्रण रद्द केल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. 

नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधार्‍यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयाजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस, यवतमाळ शहर काँग्रेस, यवतमाळ महिला जिल्हा काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयूआय, जिल्हा काँग्रेस सेवादल, काँग्रेस समितीचा ओबीसी विभाग आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले.