Breaking News

नर्मदेत बोट उलटून पाच जणांचा मृत्यू


नंदुरबार/ प्रतिनिधी: 
नंदुरबार जिल्ह्यातील धडगावजवळ नर्मदा नदीच्या पात्रात मंगळवारी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच प्रवासी दगावले आहेत, तर 36 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. धडगावच्या भुसा पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. 

येथील स्थानिक आदिवासींमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी नर्मदा स्नानाला जाण्याची प्रथा आहे. त्यासाठीच काहीजण बोटीने नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावर जात होते; मात्र या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने ही बोट बुडाली. स्थानिक लोक आणि प्रशासनाने यापैकी अनेकांना बाहेर काढले. यापैकी 36 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, अजूनही नदीच्या पात्रात शोधकार्य सुरू आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. 

स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडे या दुर्घटनेबाबत कोणतीही ठोस माहिती नाही; मात्र बोटीतील चार ते पाच प्रवासी पोहत किनार्‍याला लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. नदीच्या काठावर बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. स्थानिक प्रशासनाकडून याठिकाणी 8 रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत.