Breaking News

चारूदत्त आफळेबुवांना समर्थ संतसेवा पुरस्कार जाहीर


सातारा (प्रतिनिधी) : सज्जनगडावरील श्रीसमर्थ सेवा मंडळाच्यावतीने सन 2018 चा समर्थ संत सेवा पुरस्कार प्रसिध्द कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांना देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यवाह मारुतीबुवा रामदासी यांनी दिली. 

संतांच्या मार्गदर्शक विचारांतून समाजप्रबोधन व्हावे, म्हणून प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना प्रतिवर्षी हा पुरस्कार देवून गौरवण्यात येते. यंदा या पुरस्काराचे तेरावे वर्ष असून यापूर्वी प्राचार्य शिवाजीराव भोसले, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, प्राचार्य राम शेवाळकर, शंकरराव अभ्यंकर, स्वामी गोविंद देव, डॉ. यशवंत पाठक, सुनील चिंचोलकर आदी मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. रुपये 21 हजार, मानचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून सोमवार दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. डॉ. डी. व्ही. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुदेव शंकरराव अभ्यंकर यांच्या हस्ते पुण्यामध्ये लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.