Breaking News

ब्रिटनच्या अँडी मरेचे निवृत्तीचे संकेत


लंडन : ब्रिटनचा माजी टॉपसिडेड पुरुष टेनिसपटू अँडी मरेने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पुढील आठवडयात सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेनंतर अँडी मरे निवृत्तीची घोषणा करण्याची शक्मयता आहे. पार्श्‍वभागाला झालेल्या दुखापतीचा त्याला वारंवार त्रास होत असल्याने त्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काही दिवसापासून मरेला वारंवार पार्श्‍वभागातील स्नायूंमध्ये वेदना जाणवत आहेत. 

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत आपण सहभागी होणार असल्याचे मरेने सांगितले. 31 वर्षीय अँडी मरे पुरुषांच्या एटीपी मानांकनात सध्या 230 व्या स्थानावर आहे. मरेने आतापर्यंत आपल्या टेनिस कारकिर्दीत पाच वेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे. एक वर्षापूर्वी मरेच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या जूनमध्ये मरेने टेनिस क्षेत्रात आपले पुनरागमन केले होते. पण 2018 च्या टेनिस हंगामात त्याला पुन्हा तंदुरूस्तीची समस्या जाणवू लागल्याने त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. मरेने आतापर्यंत दोन वेळा विंबल्डन गँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत मरेचा पहिल्या फेरीतील सामना येत्या सोमवारी स्पेनच्या ऍग्युटशी होणार आहे.