Breaking News

पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; पंतप्रधान मोदी यांचे संकेत;पूर्वीच्या स्ट्राईकने अक्कल नाही


नवीदिल्लीः पाकिस्तान भारताच्या कुरापती काढणे सोडत नाही. पाकिस्तानकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवणे साफ चुकीचे आहे. पाकिस्तानला सुधारायचे असेल, तर त्याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. एका सर्जिकल स्ट्राइकने त्यांना अक्कल आली असे दिसत नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एका सर्जिकल स्ट्राइकचे संकेत दिले आहेत. 

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी यांनी आक्रमक होत पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत, दहशतवादी हल्ले थांबले नाहीत, तर आम्हाला आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करावेच लागेल असे संकेत मोदी यांनी दिले आहेत. एकीकडे पाकिस्तानची चर्चेची भाषा होते आणि दुसरीकडे भारतावर दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवणे हे चुकीचे ठरेल त्यांना एका लढाईने अक्कल आली, असे अजिबात वाटत नाही, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेचे ऊर्जित पटेल यांनी त्यांना दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली असेही मोदी यांनी म्हटले आहे. पटेल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे दिला. त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता, असे स्पष्टीकरण मोदी यांनी दिले. पटेल यांनी गव्हर्नरपद सोडल्यावर मोदी यांनी दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. पटेल यांनी पद सोडण्याबाबत सहा ते सात महिने आधी लेखी लिहूनही कळवले होते. त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव असण्याचा प्रश्‍नच नव्हता, असे मोदी यांनी म्हटले आहे. 2016 मध्ये मोदी यांनी पटेल यांची नियुक्ती केली होती.

नोटाबंदी हा झटका नव्हता, तर आम्ही एक वर्ष आधीपासून सांगत होतो, की काळ्या पैशाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशा शब्दांत त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. मोदी यांनी नोटाबंदी हा अचानक घेतलेला झटका देणारा निर्णय नव्हता असे त्यांनी म्हटले आहे. तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तुम्ही तो डिपॉझिट करा, दंड भरा आणि आम्ही तुम्हाला मदत करू असे आम्ही एक वर्ष आधीच सांगितले होते, असे त्यांनी निदर्शनास आणले. बहुतेकांना असे वाटले, की मोदी हे इतरांसारखेत निघतील. त्यामुळे फारच थोडे लोक काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पुढे आले असे त्यांनी सांगितले