Breaking News

भाजपच्या संस्थापकालाच पुन्हा सत्ता येण्याबाबत साशंकता

संघप्रिय गौतम यांच्या पत्रात भीती; गडकरींना उपपंतप्रधान करण्याची मागणीनवीदिल्लीः भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी भाजपला घरचा आहेर देताना पक्षात बदल करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट ओसरली असून भाजपची पुन्हा सत्ता येण्याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. 

त्यांच्या मते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उप-पंतप्रधान करण्यात यावे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या जागी राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा द्यावी. यासोबतच, अमित शहा यांना राज्यसभेत नेतृत्वाची जबाबदारी सोपवून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना देण्यात यावी. असे बदल केल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्‍वास वाढेल असे संघप्रिय म्हणाले आहेत. संघप्रिय यांनी यासंदर्भात एक पत्रसुद्धा प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपले पद सोडून धार्मिक कार्यांमध्ये अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. मोदी यांच्याबाबतही त्यांनी आपले मत परखडपणे व्यक्त केले. ते म्हणाले, की मोदी यांनी देशाचा नावलौकिक वाढविला. ते देशातील सर्वात लोकप्रिय आणि आवडते नेते आहेत; परंतु देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही. भारताची सद्यस्थिती पाहता, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट चालेल, याची शक्यता कमीच आहे असे भाकित त्यांनी वर्तवले आहे.


केवळ देशातील जनताच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत. 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला आपला विजय निश्‍चित करायचा असेल, तर त्यांना हे बदल करावेच लागतील. संघप्रिय यांनी सरकारच्या नियोजन आयोगाला नीति आयोग करणे, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), रिझर्व्ह बँक इत्यादी घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप, मणिपूर आणि गोव्यात फोडा-फोडीचे राजकारण या सर्वच मुद्द्यांवर सरकारला घरचा आहेर दिला. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ‘मोदी मंत्र’ पुन्हा काम करण्याची शक्यता कमीच आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हे मान्य आहे; पण ते बोलू शकत नाहीत.
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात राग पसरला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, जर आता निवडणुका झाला तर भाजप काही राज्य वगळता सर्व ठिकाणांहून सत्तेबाहेर जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
तत्पूर्वी, महाराष्ट्रात राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून गडकरी यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली होती. जर पक्षाला 2019 मध्ये निवडणुका जिंकायच्या असतील, तर त्यांनी गडकरींना पंतप्रधान केले पाहिजे. गडकरी हे दशकांपासून भाजप आणि संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पंतप्रधानपदासाठी ते अत्यंत योग्य आहेत, असे तिवारी यांनी म्हटले होते.
.