Breaking News

कराड येथे अंगणवाडी कर्मचार्‍यांचे जेलभरो


कराड (प्रतिनिधी) : हमारी युनियन हमारी ताकद, मानधन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं आदी घोषणांनी कराड परिसर दणाणून सोडत हिंदू मजदूर सभा संलग्न महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभेच्या कराड तालुका शाखेच्यावतीने कराड येथे तालुक्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

या मोर्चात कराड तालुक्यातील सुमारे 150 अंगणवाडी महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे नेतृत्व कर्मचारी सभेच्या तालुकाध्यक्ष सौ. नलिनी मस्के, उपाध्यक्ष सुकेशनी गाडे, कार्याध्यक्षा संगीता गुरव यांनी केले. हा मोर्चा येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनाबाहेरील रस्त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका ज्वौजाळ यांनी आडविला. पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना अटक केली. 

पोलीस व्हॅनमधून आंदोलनकर्त्यांना महिलांना काही काळासाठी कराड शहर पोलीस ठाण्यात स्थानबध्द करण्यात आले. त्यांची नावे व अन्य माहिती लिहून घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, एकात्मिक बाल विकासचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले.