Breaking News

संचेती हॉस्पिटलला आग; सात कामगार जखमी


नागपूर/प्रतिनिधीः
नागपूर रेल्वे स्थानक परिसरात बांधकाम सुरू असलेल्या किंग्ज वे रस्त्यावरील संचेती रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीमुळे सात कामगार जखमी झाले असून दोघांची प्रकृत्ती गंभीर आहे. आतापर्यंत आग लागलेल्या इमारतीमधून आठ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप काहीजण इमारतीत अडकून पडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


कस्तुरचंद पार्कसमोरील किंग्ज वे रस्त्यावर संचेती हॉस्पिटलच्या दहा मजली इमारतीला आग लागली. ही आग इमारतीच्या चौथ्या मजल्यापासून वर लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग शमवण्याचे आणि कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. किंग्ज वे रस्त्यावर मोठी सरकारी तसेच खासगी कार्यालये आहेत. त्यात पार्किंगच्या अडचणीमुळे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पोहचण्यास अडचण झाली. तरीही वाट काढून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. सध्या येथील आग नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.