Breaking News

प्रिव्हीलेज कंपनीच्या स्फोटातील जखमी कामगाराचा उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू


लोणंद(राहिद सय्यद) : लोणंद एमआयडीसीमधील प्रिव्हीलेज इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीत सोमवार, दि 7 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बॉयलरमध्ये स्फोट होऊन आग लागली होती. या आगीमध्ये तीन कामगार जखमी झाले होते. यापैकी एका कामगाराचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे लोणंद औद्योगिक वसाहती मधील सर्वच कंपन्यामधील कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

याबाबत लोणंद औद्योगिक वसाहतीमधुन मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणंद एमआयडीसीमधील प्रिव्हीलेज इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीत सोमवार, दि 7 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक स्फोटाचा आवाज होऊन कंपनीत आग लागून धुराचे लोट बाहेर येत होते. कंपनीत अचानक लागलेल्या या आगीमुळे कामगाराची मोठी पळापळ झाली होती. ही आग जेजुरी व निरा येथून अग्नीशामक दलाचे दोन बंब बोलावण्यात आले होती. यावेळी घटनास्थळी लोणंद पोलीसही दाखल झाले होते. तसेच कंपनी परिसरात नागरिकानी गर्दी केली होती. या घटनेमध्ये संजय पवार (रा. निरा, ता. पुरदंर), अक्षय थोपटे (रा. पिंपरे बु।, ता. पुरंदर), दत्तात्रय भुंजग सोनवलकर (मुुळ रा. मोराळे, ता बारामती, सध्या रा. साखरवाडी, ता. फलटण) हे कामगार गंभीर जखमी झाले होते. यामधील दत्तात्रय सोनवलकर यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविले होते. मात्र, उपचारादरम्यान पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, प्रिव्हीलेज कंपनीत लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेमुळे लोणंद एमआयडीसीमधील सर्वच कंपन्यातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोणंद औद्योगिक वसाहतीत दररोज काहीना काही घटना घडत असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणाची उलट सुलट चर्चा सुरु आहे.