Breaking News

उधवणे सरपंचाकडून राजकीय व्देषापोटी खोटे आरोप


ढेबेवाडी (प्रतिनिधी) : उधवणे, (ता. पाटण) येथील विद्यमान सरपंच विजय खाशाबा साळुंखे व उपसरपंच रामचंद्र बाबू साळुंखे यांनी केवळ राजकीय व्देषापोटी व गावातील अंतर्गत गटातील वादामुळे आमच्यावर खोटे आरोप केले आहेत. संबंधित विषय विधीमंडळामध्ये तारांकित प्रश्‍न म्हणून विद्यमान आमदारांनी उपस्थित केले होते. त्यामुळे सध्याच्या ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठीच हे आरोप केले असल्याचे पाटण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस शांताराम उर्फ सदाभाऊ साळुंखे यांनी म्हटले आहे. 

याबाबत साळुंखे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 14 व्या वित्त आयोगांतर्गत उधवणेला नळपाणी पुरवठा दुरूस्तीचे काम सन 2017/18 मध्ये मला मक्त्याने दिले होते. ते काम पूर्ण होऊन त्याचे मोजमाप वही व पूर्णत्वाचा दाखला ग्रामपंचायतीकडे दिला आहे. तरीसुध्दा राहिलेली रक्कम मला आजपर्यंत मिळालेली नाही. सदर कामाची रक्कम आदा करण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस पत्र दिले होते. तरीसुद्धा उर्वरित रकमेची मागणी केली असता उडवा- उडवीची उत्तरे देऊन विद्यमान सरपंच, उपसरपंच आर्थिक तडजोडीची भाषा करीत आहेत. शांताराम साळुंखे पुढे म्हणाले की, शासनाच्या श्यामा प्रसाद मुखर्जी या योजनेतून 25 लाख रुपये गावाला मंजूरीसाठीचा ठराव सर्व गावाला विश्‍वासात न घेता बोगसरित्या सध्याचे ग्रामसेवक ए. पी. ठाकरे यांच्यावर दबाव आणून घेऊन जोडला असल्याचे ग्रामसेवक यांनी लेखी जबाब अर्जावरून दिला आहे. या योजनेचे बँक खाते कोठे व कोणाच्या नावे उघडले आहे. याचे गौडबंगाल कळाले नाही. सदर योजनेला गावाचा विरोध असताना सरपंचांनी पदाचा गैरवापर केला आहे. दरम्यान, विद्यमान सरपंच विजय साळुंखे यांनी मला सरपंच करा, गावातील दोन गटातील पूर्वीची भांडणे मिटवतो. असे नोटरी करून दिले आहे. मात्र गाव विकासाकडे न्यायचे सोडून वैयक्तिक सूड भावनेने गावाला व प्रशासनाला नाहक वेठीस धरण्याचे काम चालू आहे,लपवाछपवी करीत मी थेट सरपंच झालोय, असा ते बहाणा करीत आहेत, असे माजी सरपंच सौ. निता जगन्नाथ साळुंखे यांनी म्हटले आहे.