Breaking News

उपभोगवादी जगाला गांधींचा विचार तारू शकतो : सत्यपाल महाराज


बुलडाणा,(प्रतिनिधी): आजच्या भरकटलेल्या उपभोगवादी जगाला गांधींचा विचारच तारू शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले. 5 जानेवारीला गांधीघर पाडळी येथे सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणेदार अमित वानखेडे व गांधीघरचे संयोजक प्रा संतोष आंबेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते म.गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कीर्तनाची सुरुवात करण्यात आली .

पुणे येथील गांधी स्मारक निधी अंतर्गत गांधीघर पाडळी ही संस्था चालवल्या जाते. येथे गांधी घराच्या वतीने गावात एक सार्वजनिक वाचनालय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे .या वाचनालयाच्या परिसरात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन गांधींच्या पाडळी आणि बुलडाणा ग्रामीण पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. समाजातील वाढती अंधश्रद्धा व व्यसनाधीनता तसेच कुटुंब कुटुंबातील कलह या अनुषंगाने सत्यपाल महाराज यांनी लोकांचे प्रबोधन केले. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे दाखले देत समाज जागृत राहण्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी काही लहान मुलांना तसेच गावातील विधवा महिलांना पुस्तक भेट स्वरूपात देऊन वाचनाबद्दल तरुणांनी दक्ष असावे असे आवाहन केले. महात्मा गांधी स्मारक निधी पुणे यांच्या वतीने तुषार झरेकर यांनी उपस्थित समुदायाला गांधी स्मारक निधी च्या कामाची माहिती दिली. प्रा.अनिल रिंढे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. सुरुवातीला बुलडाणा ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने व गांधी स्मारक निधीच्या वतीने पाडळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सविता पवार यांनी सत्यपाल महाराज यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेंद्र लांजेवार ,, बुलडाणा ग्रामीण ठाणेदार अमित वानखेडे,पंजाबराव गायकवाड प्रा. डॉ. संतोष आंबेकर,शहिना पठाण, ना.है.पठाण, डॉ विजया काकडे , सौ.जयश्री शेळके,प्रदीप हिवाळे, निशांत सुरडकर,अमरचंद कोठारी, व गावकरी बंधुंनी मेहनत घेतली.