Breaking News

लोकसेवा प्रतिष्ठानची खातगुणमध्ये स्थापना


पुसेगाव (प्रतिनिधी) : प्रत्येक गावातील युवा पिढी ही त्या त्या गावची खूप मोठी शक्ती आहे व तिच्या साह्याने परिसराचा मोठा विकास साध्य केला जाऊ शकतो. लोकसेवा प्रतिष्ठानची स्थापना हाच एकमेव पवित्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश लावंड यांनी केले.

खातगुण (ता. खटाव) येथे लोकसेवा प्रतिष्ठानच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. गावामध्ये युवापिढीस सोबत घेऊन अनेक सामाजिक व विधायक कामे राबवण्याचा उद्देशाने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. गावातील प्राथमिक शाळेला स्वखर्चाने स्टेज बांधून देणं, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तू देणे, वाचकांसाठी मोफत वाचनालय उपलब्ध करून देणे, गावातील होतकरू युवक, युवतींनी विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार, दलदलीच्या ठिकाणी मुरूम टाकणे अशी विविध कामे त्यांनी केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केली आहेत. 

या पुढे युवा शक्ती हाती घेऊन जलसंधारण व इतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला सरपंच अनिल साठे, उपसरपंच रवींद्र लावंड, माजी सरपंच श्रीकांत लावंड, अशोक पाटील, सोसायटी चेअरमन शामराव भोसले, विविध मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलम मुल्ला यांनी केले. श्रीकांत लावंड यांनी आभार मानले.