Breaking News

चाफळच्या सितामाई यात्रेसाठी यंत्रणा सज्ज


पाटण (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र चाफळ येथील सितामाईची यात्रा मंगळवार, दि. 15 रोजी होत असून यात्रेसाठी शासकिय यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती मंडलाधिकारी हणमंतराव शेजवळ यांनी दिली. 

येथील श्रीराममंदीर समर्थ सभागृहात आयोजित सितामाई यात्रा नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे, सरपंच अलका पाटील, उपसरपंच उमेश पवार, विश्‍वस्त चंद्रकांत पाटील, अनिल साळुुंखे, व्यवस्थापक बा. मा. सुतार, हवालदार गणेश भोसले, सुशांत शिंदे, पोलीस पाटील सागर चव्हाण, तलाठी एस. एस. दुधगावकर, शासकिय अधिकारी उपस्थित होते.

शेजवळ म्हणाले, दक्षिण महाराष्ट्रातील सुप्रसिध्द असलेल्या व पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या चाफळ येथील सितामाई यात्रेला सुमारे तीन दशकांची परंपरा आहे. महिलांची वाढती संख्या लक्षात घेता श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सितामाई दर्शन, पिण्याचे पाण्याची व्यवस्थेसह मंदीरात परिसरात बॅरिकेट, शेजारील शेतात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

रामपेठेत बसविलेल्या पेव्हर ब्लॉकवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे, ते काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने संबंधितांना नोटीसा द्याव्यात. तसेच हातगाड्यांवरील व हॉटेलमधील खाद्य पदार्थांची तपासणी करीत कोणताही दुकानदार निळा किंवा पिवळा गॅस सिलेंडरचा वापर करत असल्यास त्यांच्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.